पी-३०५ तराफ्याच्या कॅप्टनवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद !
ओ.एन्.जी.सी.च्या ९९ तराफ्यांपैकी ९४ तराफे परत आले होते
मुंबई – तौक्ते चक्रीवादळामध्ये पी-३०५ या तराफ्यावरील कामगारांचा जीव धोक्यात घातल्यामुळे कॅप्टन राकेश बल्लव आणि इतरांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पी-३०५ तराफ्याच्या अभियंत्याने दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
‘बॉम्बे हाय’ क्षेत्रात तेल उत्खनन करणार्या सर्व तराफ्यांवरील कॅप्टनना तटरक्षक दलाने चक्रीवादळाची सूचना दिली होती, असे ओ.एन्.जी.सी.ने सांगितले. ओ.एन्.जी.सी.चे ९९ तराफे त्या वेळी समुद्रात होते. त्यापैकी ९४ तराफे परत आले; परंतु पी-३०५ हा तराफा परत आला नाही. त्यानंतर चक्रीवादळात तो बुडाला. या दुर्घटनेत आतापर्यंत ४९ जणांचा मृत्यू झाला, तर ३५ जणांचा अद्याप शोध चालू आहे.
‘अॅफकॉन’ हे आस्थापन ओ.एन्.जी.सी.साठी काम करते. दोन्ही आस्थापनांनी तराफ्याची मालकी असणारे डूरमास्ट एंटरप्राइजेस आणि तराफ्याचे कॅप्टन यांना या घटनेसाठी उत्तरदायी ठरवले आहे.