कोरोना : जनतेला भोगाव्या लागणार्या यातनांना कारणीभूत कोण ?
‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
एका राज्यात कोरोनाबाधित झालेल्या एका साधकाला रुग्णालयात भरती झाल्यावर आलेले कटू अनुभव
काही दिवसांपूर्वी एका राज्यातील एक साधक कोरोनामुळे आजारी होते. रुग्णालयात उपचार घेत असतांना तेथील गैरप्रकारांमुळे त्यांना झालेला मानसिक त्रास, तसेच आर्थिक हानी आणि फसवणूक यांविषयी आलेले अनुभव त्यांच्याच शब्दांत दिले आहेत.
एका आधुनिक वैद्यांनी कोरोनाचा फुप्फुसांत संसर्ग झाल्याचे, तर दुसर्या आधुनिक वैद्यांनी संसर्ग झाला नसल्याचे सांगणे; त्यानंतर पोटाचे त्रास चालू झाल्यावर कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगून रुग्णालयात भरती होण्यास सांगणे
‘काही दिवसांपूर्वी मी कोरोनामुळे आजारी होतो. माझी कोरोनाविषयीची चाचणी केली असता अहवाल सकारात्मक आला. त्या वेळी आधुनिक वैद्यांकडून मला छातीचे ‘स्कॅन’ करून घेण्यास सांगण्यात आले. त्यानुसार मी ते करून घेतले; मात्र सध्या रुग्णसंख्या पुष्कळ असल्यामुळे मला केवळ अहवालाची ‘फिल्म’च देण्यात आली. ही ‘फिल्म’ रुग्णालयातील एका कनिष्ठ आधुनिक वैद्याने पाहिली आणि फुप्फुसांत १० ते १५ टक्के संसर्ग झाल्याचे सांगितले. त्यावर माझा विश्वास बसला नाही म्हणून मी तो अहवाल घेऊन दुसर्या रुग्णालयात गेलो. तेथे त्यांनी मला ‘माझ्या फुप्फुसांत कसलाही संसर्ग झालेला नसून मी घरी राहून कोरोनाच्या आजारावर उपचार घेऊ शकतो’, असे सांगितले. त्याप्रमाणे मी घरीच विलगीकरणात राहून उपचार घेण्यास आरंभ केला. त्याच कालावधीत मला पोटाचे त्रास चालू झाले. त्यासाठी मी आणखी एका आधुनिक वैद्यांकडे गेलो. त्यांनी मला ‘माझ्या पोटात कोरोनाचा संसर्ग झाला असून उपचारासाठी रुग्णालयात भरती होणे आवश्यक आहे’, असे सांगितले. पूर्वी उपचारासाठी गेलेल्या रुग्णालयात खाटा नसल्याने मी तिसर्याच एका रुग्णालयात उपचारासाठी भरती झालो.
रुग्ण रुग्णालयात ४ दिवस भरती असतांना रुग्णालयाने विमा आस्थापनाला विम्याची अधिकाधिक रक्कम मिळवण्यासाठी ६ दिवस भरती असल्याचे कळवणे
माझ्यावर अतीदक्षता आणि सामान्य कक्षात प्रत्येकी २ दिवस असे एकूण ४ दिवस उपचार करण्यात आले अन् त्यानंतर आधुनिक वैद्यांनी मला घरी जाण्याविषयी अनुमती दिली. यानंतर रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने मला ‘देयक आणि आरोग्य विमा यांच्या संदर्भात अडचण आली आहे’, असे सांगून पुढील ३ दिवस तेथेच ठेवून घेतले. पुढील ३ दिवसांत माझ्यावर काही वेळा अत्यल्प उपचार आणि काही वेळा उपचारही केले नाहीत अशी स्थिती होती; मात्र रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने माझ्या आरोग्य विमा आस्थापनाला ‘मी रुग्णालयात ६ दिवस भरती असून त्याचा व्यय ९० सहस्र रुपये आला आहे’, असे कळवले. विमा आस्थापनाने यांपैकी ७० सहस्र रुपये देण्याचे मान्य केले. मी ‘प्रत्यक्षात मी केवळ ४ दिवस उपचार घेतलेले असतांना विमा आस्थापनाला ६ दिवस उपचार घेतले, असे का कळवले ?’, असे विचारल्यावर व्यवस्थापनाने ‘विम्याची अधिकाधिक रक्कम मिळवून देऊन मला आर्थिक साहाय्य व्हावे’, या हेतूने असे कळवल्याचे सांगितले.
रुग्णालयाने रुग्णाकडून अतिरिक्त ३० सहस्र रुपयांची मागणी करणे आणि त्याविषयी प्रतिष्ठितांकडून दबाव आणल्यावर अन् रकमेची तडजोड केल्यावर रुग्णाला ‘डिस्चार्ज’ मिळणे
त्यानंतर रुग्णालयाने ‘विमा आस्थापनाला दिलेल्या देयकात काही उपचारांचा व्यय समाविष्ट केलेला नाही’, असे सांगून माझ्याकडून अतिरिक्त ३० सहस्र रुपयांची मागणी केली. त्यावर मी त्यांना ‘ही रक्कमही तुम्ही विमा आस्थापनाकडून घ्यावी’, असे सांगितले; पण त्यांनी त्याकडे कानाडोळा केला. याविषयी मी विमा आस्थापनाला कळवल्यावर त्यांनी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला ‘माझ्याकडून कोणतीही अतिरिक्त रक्कम न घेता मला घरी सोडावे’, असे सांगितले; पण त्याचा काही लाभ झाला नाही आणि त्यांनी मला घरी सोडले नाही. (रुग्णालयाची अरेरावी जाणा ! अशा रुग्णालयांची अनुमती प्रशासनाने रहित करणे आवश्यक ! – संपादक) शेवटी रुग्णालयाच्या दबावाला बळी पडून मी त्यांना ही रक्कम देण्याचे मान्य केले आणि त्याची पावती मागितली. रुग्णालयाने पावती देण्यास स्पष्ट नकार दिला. (रुग्णालयाकडून करण्यात येणारा भ्रष्टाचाराचा एक प्रकार ! अशा रुग्णालयांच्या विरोधात तक्रार करून त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक ! – संपादक) या संदर्भात आमच्यात पुष्कळ विवाद झाला. रुग्णालयाचा कर्मचारी अगदी स्पष्टपणे म्हणाला, ‘‘कोरोना महामारी म्हणजे औषधनिर्माण करणार्या आस्थापनांसाठी आशीर्वाद आहे. हा एक व्यवसाय झाला आहे. आर्थिक लाभासाठी सर्व रुग्णालये असेच करतात. शहरातील रुग्णालयांपेक्षा आमचे रुग्णालय पुष्कळ चांगले आहे.’’ आमच्या भागातील काही प्रतिष्ठित लोकांनी या प्रकरणात लक्ष घातल्यावर रुग्णालयाने पुढील दिनांक घातलेले देयके देण्याचे मान्य केले.
रुग्णालयातून बाहेर पडण्यापूर्वी मी त्यांनी केलेल्या मागणीनुसार तेथे २० सहस्र रुपये भरले आणि उरलेले १० सहस्र रुपये विमा आस्थापनाला भरण्याविषयी विनंती केली, जी त्यांनी मान्य केली. अशा प्रकारे ३० सहस्र रुपये भरून घेतल्यावरच मला तेथून सोडण्यात आले. या सर्व प्रसंगात मला विमा आस्थापनाने पुष्कळ साहाय्य केले आणि आधारही दिला. त्यांनी या प्रकरणात लढा देण्याची सिद्धताही दर्शवली होती; मात्र मला रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची भीती वाटल्याने मी यासाठी नकार दिला.
रुग्णालयात भरती असतांना लक्षात आलेली काही अन्य सूत्रे
१. रुग्णालयात अतीदक्षता कक्षासह सर्वच खोल्यांत दूरचित्रवाणी संच होते.
२. जेवण चांगले होते; मात्र काही वेळा त्यात मसालेदार पदार्थही असत.
३. ‘मला घरी पाठवल्यावर मी वापरलेला पलंग २ दिवस इतर कुणाला वापरायला दिला जाणार नाही’, असे व्यवस्थापनाने सांगितले होते; पण मी तेथे असतांना माझ्या समोरच त्यांनी माझा पलंग इतर रुग्णांना दिला. (कोरोनाविषयक नियमांना हरताळ फासणारे रुग्णालय प्रशासन ! – संपादक)
४. पुष्कळदा मला तेथे असलेल्या इतर रुग्णांसमवेत मिसळण्याविषयी सांगण्यात येत असे; पण मी ते कधीही मान्य केले नाही. (रुग्णालय प्रशासनाचा अजब सल्ला ! अशामुळे उद्या कुणाला कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याला उत्तरदायी कोण ? – संपादक)
५. मला पुष्कळदा तेथील कर्मचार्यांना स्वतःची औषधे आणि ‘इंजेक्शन्स्’ यांविषयी विचारावे लागे आणि ते त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत. काही वेळा ‘इंजेक्शन्स्’ न देताही ‘ते दिले आहे’, असे तेथील कर्मचारी आधुनिक वैद्यांना सांगत असत. (अशा कर्मचार्यांवर रुग्णालय प्रशासनाने कठोर कारवाई करणे आवश्यक ! – संपादक)
६. रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने मला ‘व्हिडिओ’द्वारे अभिप्राय देेण्यास सांगितले. त्या वेळी मी तेथील कर्मचार्यांचे रुग्णांकडे होणारे दुर्लक्ष हा विषय सांगितल्यावर ‘सध्या पुष्कळ रुग्णसंख्या असल्याने कर्मचार्यांवर ताण आहे आणि त्यामुळे असे होणे साहजिकच आहे’, असे स्पष्टीकरण व्यवस्थापनाकडून दिले गेले. यावरून रुग्णालयाला केवळ चांगले किंवा सकारात्मकच अभिप्राय हवे आहेत, असे माझ्या लक्षात आले.
७. वातानुकूलित यंत्रणा नसणार्या साध्या खोलीचे प्रतिदिनचे मूल्य १३ सहस्र रुपये आहे, असे त्यांनी अवैध देयक बनवतांना मला सांगितले.
कोरोनाविषयी नागरिकांमध्ये असलेल्या भीतीचा अपलाभ उठवून आर्थिक लुबाडणूक करणे
मी ज्या ज्या रुग्णालयांत उपचारासाठी गेलो होतो, ती माझ्या परिचयाची असूनही त्यांतील दोन २ रुग्णालयांनी मला लुबाडण्याचा प्रयत्न केला. या कालावधीत मी पुष्कळ ताणात होतो. रुग्णालयात अतिरिक्त रक्कम भरावी लागल्याचेही मला दुःख झाले. माझ्या आरोग्य विमा आस्थापनाने या प्रकरणात लढा देण्याची सिद्धता दर्शवूनही त्यांची साथ दिली नाही. एवढेच नाही, तर रुग्णालयात अतिरिक्त रक्कम भरतांना खोटी देयके करून घेतली गेली, याचीही मला तीव्र खंत वाटते. या प्रसंगावरून रुग्णालये ‘लोकांच्या मनातील कोरोना महामारीविषयी असणार्या भीतीचा अपलाभ उठवून त्यांची अधिकाधिक आर्थिक लुबाडणूक करत आहेत’, असे माझ्या लक्षात आले. सध्याच्या काळात भारतातील आरोग्य व्यवस्थेची विदारक अवस्था समाजाला कळावी, यासाठी मी ही सूत्रे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.’
– एक साधक
‘या लेखात छापण्यात आलेले अनुभव वैयक्तिक आहेत. असे अनुभव प्रत्येकाचे असतीलच, असे नाही. तसेच यामध्ये अफवा पसरवण्याचा हेतू नाही. जनतेसमोर हे अनुभव छापण्यामागे ते प्रशासनापर्यंत पोचून त्यावर कार्यवाही व्हावी, हा उद्देश आहे. हा लेख छापण्यामागे कुणाची मानहानी करण्याचा उद्देश नाही, तर आरोग्य व्यवस्थेत सुधारणा व्हावी अन् जनतेला दिलासा मिळावा, हा उद्देश आहे.’ – संपादक |
कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव त्वरित कळवा !आपणासही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा. समाजाच्या प्रबोधनासाठी असे अनुभव त्वरित लिखित स्वरूपात कळवणे, ही काळानुसार समष्टी साधना आहे, हे लक्षात घेऊन येणारे कटू किंवा चांगले अनुभव त्वरित पाठवावेत. आरोग्य साहाय्य समितीपत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१. संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१० ई-मेल पत्ता : arogya.sahayya@hindujagruti.org |