बेंगळुरू येथे बनावट कोरोना प्रमाणपत्र देणारे २ डॉक्टर गजाआड
अशा समाजद्रोह्यांना सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !
बेंगळुरू – लोकांना बनावट कोरोना प्रमाणपत्र देणार्या आणि रेमडेसिविर इजेक्शनचा काळाबाजार करणार्या चामराजपेट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील २ डॉक्टरांना पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले. डॉ. बी. शेखर आणि डॉ. प्रजवाला अशी त्यांची नावे आहेत. डॉ. बी. शेखर हे या प्राथमिक आरोग्य केंद्राचे चिकित्सा अधिकारी आहेत. यासह त्यांचे २ साथीदार किशोर आणि मोहन वाय यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही डॉक्टर भिन्न रुग्णालयांत काम करणारे किशोर आणि मोहन यांच्या समवेत हे उद्योग करत होते. किशोर आणि मोहन हे त्यांच्याकडे येणार्या रुग्णांना चामराजपेट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला देत. तेथे डॉ. बी. शेखर आणि डॉ. प्रजवाला हे रुग्णांकडून ५०० रुपये घेऊन त्यांना आर्-टी-पीसीआर् या कोरोनाशी संबंधित चाचणीचा नकारात्मक (निगेटिव्ह) अहवाल देत. ही टोळी तब्बल २५ सहस्र रुपयांना रेमडेसिविर इंजेक्शन विकत असल्याचेही समोर आले आहे.