सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरीक्षेत्रात १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारीला बंदी
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अंतर्गत १ जून ते ३१ जुलै २०२१ या कालावधीत जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रामध्ये पावसाळी मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी यांत्रिकी मासेमारी नौकांना लागू राहील. पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणार्या बिगर यांत्रिकी नौकांना ही बंदी लागू रहाणार नाही, असे मत्स्यव्यवसाय खात्याच्या जिल्हा साहाय्यक आयुक्तांनी कळवले आहे.
या कालावधीत मासळीच्या जिवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते, तसेच या काळात खराब वातावरण, वादळी हवामान यांमुळे मासेमारांची होणारी जीवित आणि वित्त हानी टाळता येणे शक्य होते. यासाठी उपरोक्त कालावधीत सागरी क्षेत्रात (सागरी किनार्यापासून १२ सागरी मैल अंतरापर्यंत) यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे.
राज्याच्या सागरी क्षेत्राबाहेर खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणार्या नौकांना केंद्रशासनाच्या खोल समुद्रातील मासेमारीविषयीचे धोरण, मार्गदर्शक सूचना, आदेश लागू रहातील. राज्याच्या सागरी क्षेत्रात या कालावधीत यांत्रिकी मासेमारी नौका मासेमारी करतांना आढळल्यास महाराष्ट्र सागरी नियमन अधिनियम १९८१, कलम १४ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे, असे मत्स्य व्यवसाय खात्याच्या जिल्हा साहाय्यक आयुक्तांनी कळवले आहे.