‘इस्रो’ला स्वदेशी ‘ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स’च्या निर्मितीत यश !

अंतराळ क्षेत्रात कार्य करणार्‍या इस्रोने कोरोनाच्या काळात रुग्णांना साहाय्यभूत ठरून ‘ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स’ची निर्मिती करणे कौतुकास्पद !

नवी देहली – ‘इस्रो’ संस्थेला स्वदेशी ‘ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स’ची निर्मिती करण्यात यश मिळाले आहे. ‘ऑक्सिजन सपोर्ट’वर असणार्‍या रुग्णांसाठी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी हे उपकरण साहाय्यभूत ठरणार आहे. या ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरला ‘श्‍वास’ असे नाव देण्यात आले आहे.


या ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्सची एका मिनिटामध्ये १० लिटर ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची क्षमता आहे. याच्या माध्यमातून एकाच वेळी २ रुग्णांवर उपचार करता येणेे शक्य आहे. ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर ६०० वॉट पॉवर क्षमतेचा आहे, तसेच ते २२० वोल्ट ५० हर्ट्झच्या वोल्टेजवर काम करतात. याचे वजन ४४ किलो आहे. आता संपूर्ण देशाला हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देत असल्याचे इसरोच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे देशात लवकरच भारतीय बनावटीची ‘ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स’ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत.