चक्रीवादळात वृक्ष छाटणीच्या अभावी सहस्रो वृक्ष उन्मळून पडले !

(प्रतिकात्मक चित्र)

मुंबई – पावसाळा तोंडावर येऊनही मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने वृक्ष छाटणी केली नसल्यानेच चक्रीवादळामध्ये २ सहस्र ३६४ वृक्ष उन्मळून पडले आहेत. विशेष म्हणजे वृक्ष छाटणीचे कंत्राट संपल्याने जुन्या ठेकेदारानेही या कामाकडे दुर्लक्ष केले, असे स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाले आहे.

चक्रीवादळानंतर २ दिवसांनीही रस्त्यावर पडलेल्या मोठ्या वृक्षांच्या फांद्या बाजूला करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे वाहतुकीला अडचण येत आहे. नैसर्गिक आपत्तीला सामोरे जातांना उद्यान विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ, मोठी झाडे कापण्यासाठी साधनसामुग्री, विद्युत करवती उपलब्ध नाहीत. पालापाचोळा उचलण्यासाठी यंत्रणाच तोकडी पडत आहे.

वृक्ष प्राधिकरणाने वेळीच वृक्ष छाटणीसाठी कंत्राटदार नियुक्त केला असता, तर मार्च-एप्रिल मासात मोठ्या प्रमाणात वृक्ष छाटणी झाली असती. त्यामुळे भार हलका झाल्याने शेकडो झाडे कोसळलीच नसती.

वृक्ष प्राधिकरण समितीच्या या अक्षम्य विलंबामुळे मुंबई शहर सहस्रो मोठ्या आणि प्राचीन वृक्षांना मुकले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात वित्तहानी, गाड्यांची नासधूस झाली आहे. भाजपच्या सदस्यांनी स्थायी समितीत पालिकेच्या या हलगर्जीपणाचा तीव्र निषेध केला. ‘जुन्या कंत्राटदाराच्या माध्यमातून वृक्ष छाटणी आणि फांद्या हटवण्याचे काम चालू आहे. पावसाळ्यापूर्वी वृक्ष छाटणी आणि फांद्या हटवण्याचे काम पूर्ण होईल’, असा विश्‍वास स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी व्यक्त केला आहे.