पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी (वय ९२ वर्षे) यांच्या देहत्यागानंतर त्यांच्या घेतलेल्या अंत्यदर्शनाच्या वेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेली सूत्रे
‘११.५.२०२१ या दिवशी मध्यरात्री पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी (वय ९२ वर्षे) यांनी देहत्याग केला. त्यानंतर दुसर्या दिवशी त्यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. त्या वेळी मला पुढीलप्रमाणे जाणवले.
१. पू. माईणकरआजी यांच्याकडून प्रक्षेपित होत असलेली स्पंदने
पू. माईणकरआजी यांच्याकडून भाव आणि आनंद यांची स्पंदने सर्वाधिक प्रमाणात प्रक्षेपित होत असल्याचे जाणवले. पू. आजी नेहमी भावावस्थेत, तसेच आनंदी असायच्या. यावरून जाणवलेली स्पंदने योग्य असल्याचे लक्षात आले.
पू. आजींच्या देहाकडे पाहिले, तेव्हा मला त्यांच्या चेहर्याकडून भावाची स्पंदने प्रक्षेपित होत असल्याचे जाणवले. त्यांच्या छातीकडून आनंद प्रक्षेपित होत होता आणि त्यांच्या चरणांकडून चैतन्य प्रक्षेपित होत होते. त्यांच्या चरणांतून चैतन्य प्रक्षेपित होत असल्याने त्यांचे चरण प्रत्यक्षातही पिवळसर झाले होते.
२. निसर्गाने वातावरणातील दाहकता न्यून करून ते शीतल बनवणे
पू. माईणकरआजी यांच्या पार्थिव देहावर आरंभीचे क्रियाकर्म चालू झाले. तेव्हा दुपारी साडेचारची उन्हाची वेळ असूनही ऊन न्यून होऊन अचानक थंडगार वारा वाहू लागला. याचा अर्थ निसर्गाने वातावरणातील दाहकता न्यून करून ते शीतल, म्हणजे अनुकूल बनवले.
३. ‘देहत्याग होऊनही पू. माईणकरआजी अजूनही जिवंत असल्याच्या अनुभूती येणे
‘पू. माईणकरआजींची छाती वर-खाली होत असून त्यांचा श्वास चालू आहे’, असे जाणवत होते. तसेच ‘त्या आता अगदी उठून बसणार आहेत’, असेही त्यांच्या चेहर्याकडे बघून जाणवत होते. त्या शेवटपर्यंत उत्साही आणि आनंदी होत्या. त्यामुळे त्यांच्या संदर्भात तशा अनुभूती आल्या.
४. देवाने पू. माईणकरआजींची मान कलती केल्याने त्यांना शेवटी संत, साधक आणि आश्रम यांना न्याहाळत आनंदाने अंत्यसंस्कारासाठी जाता येणे
पू. माईणकरआजींना तिरडीवरून नेत असतांना त्यांची मान संत आणि साधक उभे असलेल्या दिशेने आपोआप कलली. त्या वेळी त्यांच्या बंद नेत्रांतून अश्रूंचे २ – ३ थेंब आल्याचे दिसले, तसेच त्यांचा चेहरा आनंदी दिसला. तेव्हा तेथे सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले पू. आजींचे दर्शन घेण्यासाठी आल्याचे आणि त्यामुळे पू. आजींनी त्यांच्या दिशेने मान कलती करून आनंदाश्रूंनी त्यांच्याकडे पाहिल्याचे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना जाणवले. फुलांनी सजवलेल्या गाडीतून सन्मानाने घेऊन जातांना पू. आजींचा चेहरा आश्रमाच्या दिशेने होता. यावरून देवाची लीला लक्षात आली. देवाने पू. आजींची मान कलती केल्याने त्यांना शेवटी संत, साधक आणि आश्रम यांना न्याहाळत अंत्यसंस्कारासाठी जाता आले.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.५.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार सद्गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |