कोरोना : जनतेला भोगाव्या लागणार्या यातनांना कारणीभूत कोण ?
‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
एका साधकाला कोरोनाची लागण झाल्यावर रुग्णालयात भरती केले असतांना त्याला तेथे आणि सरकारी यंत्रणा यांच्याविषयी आलेले कटू अनुभव !
महाराष्ट्रातील एका साधकाला कोरोनाची लागण झाली असतांना त्याला उपचारासाठी महानगरपालिकेचे रुग्णालय आणि कोविड केअर सेंटर येथे ठेवण्यात आले होते. हा साधक कोरोनामुक्त होऊन घरी आला आहे; मात्र उपचाराच्या वेळी त्याला आलेले कटू अनुभव या लेखाच्या माध्यमातून देत आहोत.
रुग्णालये आणि सरकारी यंत्रणा यांचा एकमेकांशी ताळमेळ नसणे
मला ताप आल्यामुळे मी कोविडविषयीच्या दोन्ही चाचण्या शहरातील महानगरपालिकेच्या एका रुग्णालयात करवून घेतल्या. चाचणींचे अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आले. त्यानंतर २ दिवसांनी मला महानगरपालिकेच्या दुसर्या रुग्णालयातून ‘उपचार घरी करणार कि रुग्णालयात ? कोणत्या रुग्णालयात करणार ?’, याविषयी विचारण्यात आले. त्या वेळी मी ‘याच (दुसर्या) रुग्णालयातच उपचार घेणार आहे’, असे सांगितले. ज्या वेळी मी रुग्णालयात उपचारासाठी गेलो, त्या वेळी पहिल्या रुग्णालयातून माझ्याविषयीची कोणतीच माहिती तेथे देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे मला दुसर्या रुग्णालयातून पुन्हा पहिल्या रुग्णालयात पाठवण्यात आले. मी पुन्हा पहिल्या रुग्णालयात गेलो; मात्र तेथे खाट (बेड) उपलब्ध नव्हती. त्यामुळे मी महानगरपालिकेच्या ‘हेल्पलाईन’ क्रमांकावर संपर्क केला. त्या वेळी त्यांनी मला ‘वॉर रूम’ला (आपत्कालीन कक्ष) संपर्क करण्यास सांगितले. तेथे संपर्क केल्यावर त्यांनी माझ्याकडून एक आवेदन भरून घेतले आणि ‘खाट उपलब्ध झाल्यावर कळवू’, असे सांगितले.
खाट उपलब्ध होण्यासाठी रुग्णालाच पाठपुरावा करावा लागणे
‘खाट उपलब्ध झाली का ?’, हे विचारण्यासाठी मी एक घंट्याने संपर्क केला, तेव्हा त्यांनी प्रक्रिया चालू असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात त्यासाठी मला पुष्कळ पाठपुरावा करावा लागला. अखेर मीच त्यांना ‘मला कोविड केअर सेंटर’मध्ये चालेल’, असे सांगितले. त्यानंतर मला त्या कोविड केअर सेंटरमध्ये जाण्यास सांगितले. या सर्वामध्ये माझा ३ घंट्यांहून अधिक वेळ गेला आणि सारखा पाठपुरावाही करावा लागला.
इंग्रजी भाषेतील आवेदनामुळे सर्वसामान्यांची अडचण होणे
रुग्णालयात भरती होण्यासाठी दिलेले आवेदन इंग्रजी भाषेत होते. त्यामध्ये रुग्णाच्या सद्यःस्थितीविषयी माहिती भरून द्यायची होती. रुग्णालयात येणार्या सामान्य रुग्णांना आवेदन भरणे सुलभ व्हावे, यासाठी खरेतर ते मराठी भाषेत असणे आवश्यक होते. आवेदन इंग्रजी भाषेत असल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना ते आवेदन भरण्यास अडचण येत होती. ही सर्वसामान्य गोष्टही रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात न येणे, यावरून तेथे रुग्णांविषयी आणि मराठी भाषेविषयी किती आत्मियता आहे ? हे दिसून आले. (मराठी भाषाद्रोही प्रशासन ! महाराष्ट्रातच होणारी मराठी भाषेची होणारी गळचेपी निषेधार्ह आहे ! – संपादक)
कोविड केअर सेंटरमध्ये असलेले अस्वच्छतेचे साम्राज्य
१. रुग्णालयात पाण्याच्या टाक्या, बसण्याची जागा, जीना परिसर या ठिकाणी ‘येथे थुंकू नये’, असे लिहिलेल्या पाट्या लावण्यात आल्या होत्या; मात्र रुग्ण त्याच ठिकाणी थुंकत होते. काही रुग्ण खाटेच्या बाजूलाच थुंकत होते. (स्वतःसह अन्य रुग्णांचेही जीव धोक्यात घालणारे आणि संसर्ग पसरवण्यास कारणीभूत ठरणारे रुग्ण ! अशांवर कठोर कारवाई करायला हवी ! – संपादक)
२. पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणीच रुग्ण हात आणि जेवणाचे डबेही धूत होते.
३. कचर्याच्या डब्यात उष्ट्या पत्रावळ्या टाकल्या जात होत्या.
४. वापरलेले मास्क, साबणाचे तुकडे, साबणाची वेष्टने रुग्ण स्नानगृहात टाकून जात असत.
५. वरच्या मजल्यावरील हस्तप्रक्षालनपात्राचा (‘बेसिन’चा) पाईप निघाला होता. त्यामुळे त्यातील घाण पाणी बाहेर पडतांना खिडकीतून रुग्णांच्या अंगावर पडत होते.
६. शौचालयातील नळाला काही वेळेस पाणीच येत नसे.
७. स्नानगृहातील ‘गिझर’ अनेकदा बंद स्थितीत असायचा.
८. कोविड कक्षात उंदीर आणि मांजर यांचा वावर मोठ्या प्रमाणात होता. ते रुग्णांच्या कपाटातील खाण्याचे पदार्थ कुरतडत असत.
(वरील स्थितीवरून कोविड केअर सेंटरच्या प्रशासनाची स्वच्छतेविषयी असलेली उदासीनताच दिसून येते. तसेच कोविड केअर सेंटरसारख्या ठिकाणी जर एवढी अस्वच्छता असेल, तर अन्य ठिकाणची सेंटर आणि रुग्णालये यांची स्थिती कशी असेल ? याचा विचारच न केलेला बरा ! अशा अस्वच्छतेमुळे तेथील रुग्णांना जर अन्य कोणताही संसर्ग झाला, तर त्याला उत्तरदायी कोण ? – संपादक)
– एक साधक
‘या लेखात छापण्यात आलेले अनुभव वैयक्तिक आहेत. असे अनुभव प्रत्येकाचे असतीलच, असे नाही. तसेच यामध्ये अफवा पसरवण्याचा हेतू नाही. जनतेसमोर हे अनुभव छापण्यामागे ते प्रशासनापर्यंत पोचून त्यावर कार्यवाही व्हावी, हा उद्देश आहे. हा लेख छापण्यामागे कुणाची मानहानी करण्याचा उद्देश नाही, तर आरोग्य व्यवस्थेत सुधारणा व्हावी अन् जनतेला दिलासा मिळावा, हा उद्देश आहे.’ – संपादक
कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव त्वरित कळवा !आपणासही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा. समाजाच्या प्रबोधनासाठी असे अनुभव त्वरित लिखित स्वरूपात कळवणे, ही काळानुसार समष्टी साधना आहे, हे लक्षात घेऊन येणारे कटू किंवा चांगले अनुभव त्वरित पाठवावेत. आरोग्य साहाय्य समितीपत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१. संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१० ई-मेल पत्ता : arogya.sahayya@hindujagruti.org |