उजनी धरणातून सोलापूरसाठी भीमानदीत सोडण्यात आले पाणी
सोलापूर – सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणार्या स्रोतांपैकी एक असलेल्या औज बंधारा कोरडा पडला असून टाकळी बंधार्यात सध्या सोलापूर शहराला पुढील १५ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शेष आहे. भीमा नदीही कोरडी पडल्याने पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला या शहरांसह नदी काठावरील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्यामुळे उजनी धरणातून २० मे या दिवशी भीमा नदीत ३ सहस्र क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करत ८ सहस्र क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार आहे.
औज बंधारा परिसरातील भीमा नदीतील टाकळी जॅकवेलजवळ सध्या केवळ ९ फूट पाणी असून, हे पाणी केवळ एक आठवडाभर सोलापूरकरांना पुरेल. उजनी धरणातून सोडलेले पाणी औज बंधार्यात येण्यासाठी अनुमाने १० ते १२ दिवस लागणार आहेत.