‘म्युकरमायकोसिस’मुळे महाराष्ट्रातील ९० जणांचा मृत्यू !

महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून उपचारांचा व्यय दिला जाणार ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

म्युकरमायकोसिस

मुंबई – ‘म्युकरमायकोसिस’ या बुरशीजन्य रोगामुळे आतापर्यंत राज्यातील ९० जणांचा मृत्यू झाला आहे. यासाठी लागणारा व्यय शासन देणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या माध्यमातून यावरील उपचारांचा व्यय दिला जाईल.

याविषयी अधिक माहिती देतांना राजेश टोपे म्हणाले, ‘‘या रोगावरील ‘अम्फोटेरिसिन बी’ या इंजेक्शनाची १ लाख ९० सहस्र इतकी मागणी संबंधित आस्थापनांकडे करण्यात आली आहे; मात्र मागणीची पूर्तता झालेली नाही. केंद्रशासनाने या औषधावरही नियंत्रण आणले आहे. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात हे ‘इंजेक्शन’ सिद्ध करण्याच्या सिद्धतेत आहोत. या रोगाचे राज्यात एकूण १ सहस्र ५०० रुग्ण आहेत. ५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर ८०० ते ८५० रुग्ण उपचार घेत आहेत. यासाठी जागतिक निविदा काढण्यात आली आहे; मात्र अद्याप त्याला प्रतिसाद नाही. त्यामुळे केंद्रशासनाने महाराष्ट्राला हे ‘इंजेक्शन’ अधिक उपलब्ध करून द्यावे.’’