शासनाने पीडितांना तातडीने भरघोस हानीभरपाई द्यावी ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रायगड जिल्ह्याची पहाणी !
मुंबई – निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी शासनाने काही घोषणा केल्या होत्या; मात्र त्याची हानीभरपाई अद्याप मिळालेली नाही. आता वर्षभरातच या नागरिकांना दुसरा फटका बसला आहे. शासनाने पीडितांना तातडीने हानीभरपाई द्यायला हवी, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यशासनाला केले आहे. तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर १९ मे या दिवशी फडणवीस यांनी रायगड जिल्ह्यातील हानीग्रस्त भागाची पहाणी केली. यानंतर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना त्यांनी वरील आवाहन केले.
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘रायगडमध्ये ८ ते १० सहस्र घरांची, विशेषत: ५ सहस्र हेक्टरमधील फळपिकांची हानी झाली आहे. उन्हाळी भातपीक, तसेच अन्य फळपिके यांचीही हानी झाली आहे. वैद्यकीय सेवा पुरवणार्या २५ इमारतींची हानी झाली आहे, तसेच वीजपुरवठाही खंडित झाला आहे. रायगड जिल्ह्यात वादळामुळे ४ जणांचा मृत्यू झाला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड येथील आंबा मुंबई, तसेच पुणे येथील बाजारात पाठवला जातो. हापूस आंब्याच्या शेवटच्या काळात आलेल्या वादळामुळे बागायतदारांची १०० कोटी रुपयांची हानी झाली असल्याचे अनुमान आहे. चक्रीवादळाचा फटका काही जिल्ह्यांनाच बसला असल्यामुळे शासनावर त्याचा अधिक आर्थिक भार पडणार नाही. त्यामुळे शासनाने भरघोस साहाय्य करायला हवे.’’