आयुर्वेदाची पदवी असतांना अॅलोपॅथीची पदवी असल्याचे दाखवून रुग्णांची दिशाभूल
सोलापूर येथील विनीत या खासगी रुग्णालयावर कारवाई
सोलापूर – शहरातील रंगभवन परिसरात असणार्या विनीत रुग्णालयाचे संचालक डॉ. विद्याधर पंढरीनाथ सूर्यवंशी यांच्या विरोधात आयुर्वेदाची पदवी असतांना अॅलोपॅथीची पदवी असल्याचे लिहून रुग्णांची दिशाभूल केल्याच्या प्रकरणी महापालिकेच्या वतीने फौजदारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे या रुग्णालयासंदर्भात तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आतिश बोरोडे, उपायुक्त धनराज पांडे, डॉ. बिरुदेव दूधभाते, लेखापरीक्षक डॉ. वैभव राऊत आदींनी पहाणी केली. या वेळी संचालक डॉ. विद्याधर सूर्यंवशी यांचे वैद्यकीय शिक्षण हे आयुर्वेद विषयातील असूनही रुग्णालयाबाहेर फलकावर सूर्यवंशी यांनी आपण ‘एम्.डी. फिजिशिअन’ असून हृदयरोग, मधुमेह, फुप्फुस विकार आणि ‘आयसीयु’ तज्ञ असल्याचे नमूद केले आहे.
विनीत रुग्णालयाने कोरोनाच्या काळात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेची अनुमती घेणे आवश्यक आहे; मात्र या रुग्णालयाने महापालिकेकडून कोणतीही अनुमती घेतलेली नव्हती. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांवर अवैध पद्धतीने उपचार करण्यात येत होते. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांना अन्य रुग्णालयात हालवण्यात येऊन विनीत रुग्णालयाला टाळे ठोकण्यात येणार असल्याचे पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी सांगितले.