मंदिरांवरील ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांना भजन, कीर्तन, श्लोक ऐकवण्यात यावेत ! – ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भाविक वारकरी मंडळ
रुग्णांना मानसिक आधार लाभावा, यासाठी आध्यात्मिक स्तरावर भजन, कीर्तन, श्लोक ऐकवण्याची स्तुत्य मागणी करणारे ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांचे अभिनंदन ! शासनाने लवकरात लवकर याची नोंद घेऊन राज्यभर हा उपक्रम चालू होण्यासाठी प्रयत्न करावेत !
सोलापूर, २० मे (वार्ता.) – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मृत्यूसंख्येत पुष्कळ वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मानसिक आधाराची आवश्यता आहे. त्यासाठी मंदिरांवर ध्वनीक्षेपक यंत्रणेद्वारे भजन, कीर्तन, भक्तीगीत, मंत्र, आरती, श्लोक, भारूड लावल्याने घराघरांत हा आवाज पोचून नागरिकांमध्ये मानसिक स्थिरता येईल, त्यांना आधार मिळेल. त्याचा लाभ रुग्ण आणि अन्य नागरिक यांना मोठ्या प्रमाणात होईल. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर हा उपक्रम राबवण्यासाठी अनुमती देण्यात यावी, या मागणीचे निवेदन अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांनी संगणकीय पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामध्ये मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याने कोरोनाबाधित रुग्णांना मानसिक आधाराची पुष्कळ आवश्यकता आहे. ‘अनेक जणांचा घाबरून मृत्यू होत आहे’, असे वाटते. रुग्णांना मानसिक आधार पुष्कळ महत्त्वाचा असतो. त्यासाठी राज्यातील गावागावांत प्रत्येक मंदिरामध्ये ध्वनीक्षेपक यंत्रणेद्वारे भजन, कीर्तन, भक्तीगीत, मंत्र लावण्यास अनुमती द्यावी.