नगर येथे ‘हनी ट्रॅप’मध्ये ‘वर्ग १’चा अधिकारी अडकला
मोठ्या पदावरील अधिकारीही ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकतात, यावरून समाजाला धर्मशिक्षण देऊन नीतीमान बनवणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते.
नगर – येथील जखणगाव येथे ‘सेक्स रॅकेट’ चालवणार्या महिलेच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये येथील ‘वर्ग १’चा अधिकारीही अडकल्याची माहिती समोर आली आहे. अधिकार्याचा अश्लील व्हिडिओ सिद्ध करून ३ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी पीडित अधिकार्यानेच तक्रार दिल्यानंतर तालुका पोलीस ठाण्यात १९ मे या दिवशी आरोपी महिलेसह तिच्या ४ सहकार्यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे आणि त्यातील १ साथीदार सचिन खेसे याला अटक करण्यात आली आहे. आरोपी महिला आणि अमोल मोरे यांना पोलिसांनी आधीच नोंद झालेल्या गुन्ह्यात १५ मे या दिवशी अटक केलेली आहे. २ दिवसांपूर्वीच एका व्यापार्याने ‘हनी ट्रॅप’ प्रकरणात तक्रार नोंद केली होती.
अधिकार्याच्या वाहनात असलेले ३० सहस्र रुपये, तसेच ‘ऑनलाईन’ ५० सहस्र रुपये त्याच्याकडून बळजोरीने घेतल्यानंतरही ही महिला या अधिकार्याला ‘ब्लॅकमेल’ करून वारंवार ३ कोटी रुपये देण्याची मागणी करत होती. ‘हनी ट्रॅप प्रकरणात या गुन्ह्यात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता असून त्या दृष्टीने पुढील तपास चालू आहे.