तौक्ते चक्रीवादळामुळे राज्याची ३५ ते ४० कोटी रुपयांची हानी ! मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
पणजी, १९ मे (वार्ता.)- ‘तौक्ते’ या चक्रीवादळामुळे गोवा राज्याची ३५ ते ४० कोटी रुपयांची हानी झाल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. १८ मे या दिवशी त्यांनी बार्देश तालुक्यातील स्थितीचा आढावा घेतला. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘बार्देश तालुक्यातील जवळजवळ १३५ घरांची या वादळामुळे हानी झाली आहे. राज्यात वीज आणि पाणी यांचा पुरवठा यांविषयीची स्थिती अजून पूर्ववत् झालेली नाही. संपूर्ण यंत्रणा पूर्ववत् होण्यास आणखी २ दिवस लागतील. या अत्यावश्यक सेवांसाठी मनुष्यबळ अल्प होत आहे. त्यामुळे शेजारील राज्यातून कामासाठी माणसे आणावी लागली.’’ (तौक्ते चक्रीवादळ ही येणार्या आपत्काळाची एक झलक होती. त्याहून मोठी नैसर्गिक आपत्ती आल्यास त्यातून सावरण्यासाठीची सिद्धता राज्याने आधीच करणे श्रेयस्कर ठरेल ! – संपादक)
कृषी क्षेत्राची ३ कोटी रुपयांची हानी
तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यातील कृषी क्षेत्राची जवळपास ३ कोटी रुपयांची हानी झाल्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘राज्यातील विभागीय कृषी अधिकार्यांनी आपापल्या भागातील हानीचा ढोबळ आढावा घेऊन हानीचा अंदाज व्यक्त केला असून पुढील ३ दिवसांत सविस्तर अहवाल आल्यानंतर प्रत्यक्ष हानी किती ते समजेल.’’
कळंगुट येथे ४ दिवस वीजपुरवठा खंडित असल्याने मायकल लोबो यांची आपत्कालीन व्यवस्थापनावर टीका
पणजी ‘चक्रीवादळानंतर गोव्यात ८० टक्के वीजपुरवठा सुरळीत झाला आहे’, या वीजमंत्र्यांनी केलेल्या विधानावर कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी आक्षेप घेत ‘अजून ५० टक्के कळंगुट अंधारात आहे’, अशी टीका केली आहे. ते म्हणाले, ‘‘आपत्कालीन व्यवस्थापन दल असे गोव्यात काहीही नाही. बार्देशमध्ये विशेष करून कळंगुट आणि कांदोळी भागांत वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे आणि ४ दिवस झाले, तरी तो पूर्ववत् झालेला नाही. येथील समस्या लक्षात घेऊन आणखी मनुष्यबळ वाढवण्याची आवश्यकता आहे. कोसळेलेले वृक्ष कापण्यासाठी योग्य ती यंत्रणा देण्यात शासनाला अपयश आले आहे. चक्रीवादळ तर सोडूनच द्या, गोव्यातील आपत्कालीन यंत्रणा मॉन्सूनमुळे निर्माण होणार्या अडचणी दूर करण्याएवढीही सक्षम नाही.’’
तौक्ते चक्रीवादळात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना २ लाख रुपये, तर गंभीररित्या घायाळ झालेल्या व्यक्तींना ५० सहस्र रुपये साहाय्य देण्याची पंतप्रधानांकडून घोषणा
पणजी तौक्ते या चक्रीवादळामुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना २ लाख रुपये, तर चक्रीवादळात गंभीररित्या घायाळ झालेल्या व्यक्तींना प्रत्येकी ५० सहस्र रुपयांचे साहाय्य देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. हे साहाय्य चक्रीवादळाचा परिणाम झालेली गोवा, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान ही राज्ये अन् दमण, दीव, दादरा नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशांतील पीडितांना देण्यात येईल.