नामजप केल्याने भीती आणि काळजी यांविषयीचे विचार न्यून होतात ! – पू. अशोक पात्रीकर, सनातन संस्था
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने तणावमुक्तीसाठी ‘विदर्भस्तरीय ऑनलाईन शिक्षक परिसंवाद’!
नागपूर – नामजप केल्याने मन स्थिर राहून आनंदी होते. तसेच भीती आणि काळजी यांविषयीचे विचार न्यून होतात. असे मार्गदर्शन सनातनचे संत पू. अशोक पात्रीकर यांनी विदर्भस्तरीय ऑनलाईन ‘शिक्षक परिसंवादा’त केले. या वेळी पू. पात्रीकरकाका यांनी कुलदेवी आणि दत्त यांच्या नामजपाचे महत्त्वही सांगितले.
कोरोनामुळे शिक्षकांना ज्ञानदान करतांना विविध समस्यांना सामोरे जावे लागून ताणाची स्थिती निर्माण होते. या विवंचनेतून शिक्षकांना बाहेर पडता येण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ११ मे या दिवशी या परिसंवादा’चे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाचा लाभ नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांतील अनेक शिक्षकांनी घेतला.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘एन्.सी.ई.आर्.टी. च्या माध्यमातून चुकीचा इतिहास शिकवला जात आहे. गौरवशाली अशी गुरुशिष्य परंपरा, ऋषिमुनींनी लावलेले असामान्य शोध यांपैकी काहीही शिकवले जात नाही. रामायण आणि महाभारत यांविषयीचे शिक्षण विदेशातील महाविद्यालयांमध्ये दिले जाते; मात्र भारतात श्रीराम आणि रामायण यांच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केले जातात. अशा घटनांच्या विरुद्ध शिक्षकांनी पुढाकार घेऊन कार्य करावे. देशाचा खरा इतिहास शिकवणे, आज काळाची आवश्यकता आहे.’’
या वेळी समितीच्या श्रीमती गौरी जोशी यांनी ‘शिक्षकांच्या अडचणी आणि सद्य:स्थिती’ या विषयावर अवगत केले. परिसंवादाचा उद्देश सनातन संस्थेच्या सौ. सुनंदा हरणे यांनी सांगितला, तर सूत्रसंचालन सौ. दीपाली सिंगाभट्टी यांनी केले.
शिक्षकांचे अभिप्राय
- शिक्षक या घटकाद्वारे आपण आपली संस्कृती विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंब यांच्यापर्यंत पोचवू शकतो. यात सनातन संस्था पुष्कळ मोलाची कामगिरी बजावत आहे.
- अप्रतिम परिसंवाद ! असे परिसंवाद नेहमी होत राहिले पाहिजेत.
- आजचा कार्यक्रम अत्यंत उपयोगी आणि महत्त्वाचा ठरला.