सप्तर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे केलेल्या ‘संजीवनी होमा’चा जाणवलेला सूक्ष्मातील परिणाम
‘विश्वातील सर्व साधकांचे त्रास न्यून होणे, त्यांचे रक्षण होणे आणि विश्वकल्याण यांसाठी सप्तर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून १२ दिवस प्रतिदिन गुळवेल वनस्पतीच्या काष्ठांच्या आहुती देऊन ‘संजीवनी होम’ करण्यास सांगितले. कलियुगात संजीवनीप्रमाणे कार्य करणारी वनस्पती म्हणजे ‘गुळवेल वनस्पती’ आहे. होमामध्ये तिची आहुती दिल्यामुळे वातावरणाची शुद्धी होऊन मानवजातीचे रक्षण होणार असल्याचे सप्तर्षींनी सांगितले.
सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे रात्री ९.४० ते १०.४० या कालावधीत रामनाथी आश्रमात प्रतिदिन हा होम करण्यात आला. त्या वेळी मला जाणवलेला सूक्ष्मातील परिणाम येथे देत आहे.
१. होमाची स्पंदने मणिपूरचक्रापासून मूलाधारचक्रापर्यंत जाऊन सुषुम्ना नाडी कार्यरत होणे
रात्री ९.४० : होमाला आरंभ झाला. होमाची स्पंदने मला मणिपूरचक्रावर जाणवू लागली आणि माझी सूर्यनाडी कार्यरत झाली.
रात्री ९.४८ : होमाची स्पंदने स्वाधिष्ठानचक्रावर जाणवू लागली.
रात्री ९.५० : होमाची स्पंदने मूलाधारचक्रावर जाणवून माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली. त्या वेळी वातावरणात सुगंध पसरला.
२. कुंडलिनीशक्ती जागृत होऊन ती मूलाधारचक्रापासून विशुद्धचक्रापर्यंत वर चढणे
रात्री ९.५५ : माझी कुंडलिनीशक्ती जागृत होऊन ती वर चढली आणि अनाहतचक्रापर्यंत आली.
रात्री १० : कुंडलिनीशक्ती विशुद्धचक्रापर्यंत पोचली.
३. होमाचा परिणाम विशुद्धचक्र आणि आज्ञाचक्र यांवर होत असल्याने वाईट शक्तींनी डोक्यापासून
गळ्यापर्यंत त्रासदायक शक्तीचे आवरण आणणे अन् नामजपादी उपाय केल्याने तो त्रास दूर होणे
रात्री १०.०५ : सूक्ष्म वाईट शक्तींनी होमावर आक्रमण करण्यास आरंभ केल्याचे जाणवले. होमाचा परिणाम विशुद्धचक्र आणि आज्ञाचक्र यांवर होत असल्याने वाईट शक्तींनी डोक्यापासून गळ्यापर्यंत त्रासदायक शक्तीचे आवरण आणले. मी आज्ञाचक्र आणि विशुद्धचक्र यांवर तळहात ठेवून ‘महाशून्य’ हा जप करत उपाय केले.
रात्री १०.१० : वाईट शक्तींनी डोक्यापासून गळ्यापर्यंत निर्माण केलेले त्रासदायक शक्तीचे आवरण नामजपादी उपायांमुळे दूर झाल्याचे, तसेच आज्ञाचक्र आणि विशुद्धचक्र यांवर जाणवणारा त्रास दूर झाल्याचे जाणवले. त्यामुळे मी उपाय करणे थांबवले. (मला होमाचा समष्टीवर होणारा परिणाम जाणवत होता. त्यामुळे ‘जेव्हा वाईट शक्तींनी होमामध्ये अडथळे आणणे आरंभ केले, तेव्हा मी नामजपादी उपाय केल्याने तो परिणाम समष्टीवर होऊन होमामध्ये येणारे अडथळे दूर होऊन होमाची फलनिष्पत्ती वाढण्यास साहाय्य झाले’, असे मला जाणवले.)
४. वाईट शक्तींनी पुन्हा आक्रमण केल्याने आज्ञाचक्र आणि विशुद्धचक्र यांवर जडत्व जाणवू लागणे अन् पुन्हा उपाय केल्यावर तो त्रास दूर होणे
रात्री १०.२५ : आज्ञाचक्र आणि विशुद्धचक्र यांवर जडत्व जाणवू लागल्याने मी पुन्हा उपाय शोधले. त्यानुसार मी ‘अंगठ्याच्या मुळाशी तर्जनीचे टोक लावणे’ ही मुद्रा करून आज्ञाचक्र आणि विशुद्धचक्र यांवर न्यास करत आकाशदेवाचा जप करणे आरंभ केले.
रात्री १०.३० : आज्ञाचक्र आणि विशुद्धचक्र यांवरील त्रास दूर झाल्याचे जाणवले.
५. होमाची स्पंदने मूलाधारचक्र ते सहस्रारचक्र अशा सर्वच चक्रांवर पोचल्याने होमामुळे मनुष्याच्या संपूर्ण देहाची शुद्धी झाल्याचे जाणवणे
रात्री १०.३५ : होमाची स्पंदने सहस्रारचक्रापर्यंत पोचली. माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली. मूलाधारचक्रापासून सहस्रारचक्रापर्यंत होमाची स्पंदने पोचल्याने होमामुळे माझ्या संपूर्ण देहाची शुद्धी झाल्याचे जाणवले.
रात्री १०.४० : याग समाप्त झाला.
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.