अरबी समुद्रातील तेल विहिरींचे काम करणार्या जहाजांना चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात फटका !
|
चक्रीवादळ येणार असल्याची पूर्वसूचना दिलेली असतांनाही जहाज आस्थापनांनी वेळीच दक्षता का घेतली नाही ? जहाज बुडून कर्मचार्यांचे प्राण गेले, या जीवितहानीला उत्तरदायी कोण ?
मुंबई – ‘मुंबई हाय’ परिसरात ‘अॅफकॉन्स’ या आस्थापनाकडून तेल विहिरींचे काम करत असलेल्या अरबी समुद्रातील जहाजांना तौक्ते वादळाचा मोठा फटका बसला आहे. वादळामुळे समुद्रातील ३ जहाजे भरकटली असून त्यांतील ‘बोर्ड हाऊसिंग बार्ज पी ३०५’ हे जहाज बुडाले असून त्यातील ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित २ जहाजे आणि एक तेलफलाट समुद्रात भरकटले असून त्यांचा शोध चालू आहे. भारतीय तटरक्षक दलाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या सर्व जहाजांतील एकूण ७०७ कर्मचार्यांपैकी ३१७ कर्मचार्यांना नौदल आणि तटरक्षक दलाने सुखरूप बाहेर काढले आहे. अद्यापही ३९० कर्मचारी समुद्रात अडकले आहेत. त्यांतील २९७ कर्मचारी सुरक्षित आहेत, तर उर्वरित कर्मचार्यांची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. ३४ जणांचे मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आले आहेत.
‘ऑईल अॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन’च्या (ओ.एन्.जी.सी.च्या) सेवेतील या ३ जहाजांपैकी ‘पी ३०५’ या जहाजातील २७३, ‘गॅल कन्स्ट्रक्टर’ या जहाजातील १८६, ‘एस्एस्-३’ या जहाजातील १९६ आणि ‘सागर भूषण’ या तेलफलाटावरील १०१ कर्मचारी समुद्रात अडकले होते. त्यांतील ‘पी ३०५’मधील १८० आणि ‘गल कन्स्ट्रक्टर’मधील १३७ कर्मचार्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. यांतील ‘पी ३०५’ हे जहाज बुडाले असून ‘गॅल कन्स्ट्रक्टर’ आणि ‘एस्एस्-३’ ही जहाजे, तसेच ‘सागर भूषण’ या तेलफलाटाची शोधमोहीम चालू आहे.
Indian Navy continues its search and rescue operation for missing crew members of Barge P305 adrift in Mumbai; visuals from the rescue operation conducted by INS Kochi
(Source: Indian Navy) pic.twitter.com/D12rw2U0li
— ANI (@ANI) May 19, 2021
खवळलेल्या समुद्रात कर्मचार्यांनी ‘लाईफ जॅकेट’च्या साहाय्याने ११ घंटे तग धरला !
१७ मेच्या दुपारी जहाजाला वादळाचे तडाखे बसू लागल्यामुळे त्यांनी नौदलाला याची माहिती दिली. जहाज बुडू लागल्यामुळे समुद्रात उड्या मारलेले कर्मचारी ‘लाईफ जॅकेट’च्या साहाय्याने समुद्रातील पाण्यावर ११ घंटे तग धरून होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी नौदलाकडून ‘आयएन्एस् कोच्ची’, ‘आयएन्एस् कोलकाता’ आणि ‘आयएन्एस् तलवार’ या युद्धनौका समुद्रात पाठवण्यात आल्या, तसेच नौदलाच्या ‘पी ८१’ या विमानाद्वारेही कर्मचार्यांचा शोध घेण्यात येत आहे. १७ मेच्या रात्री बराच वेळ नौदलाकडून शोधमोहीम चालू होती; मात्र अंधार आणि प्रचंड लाटा यांमुळे शोध घेतांना अडचण येत होती. १८ मेच्या सकाळी वादळाचा प्रभाव अल्प झाल्यावर नौदलाच्या मोहिमेला वेग आला. अद्याप समुद्रात भरकटलेल्या २ जहाजांचा शोध नौदलाकडून चालू आहे.
प्राण वाचलेल्या कर्मचार्यांना अश्रू अनावर !
प्राण वाचलेले कर्मचारी समुद्राच्या बाहेर आल्यावर त्यांना अश्रू अनावर झाले. ‘नौदलाच्या प्रयत्नांमुळे आज आम्ही जिवंत आहोत’, याविषयी सर्व कर्मचार्यांनी नौदलाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. नौदलाचे अधिकारी सचिन सिक्वेरा प्रसिद्धीमाध्यमांना म्हणाले, ‘‘नौदलाच्या युद्धनौका आणि लढाऊ विमाने यांच्याकडून शोधमोहीम चालू आहे. या परिसरात असलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. आपण आशावादी असायला हवे. परिस्थितीत सुधारणा झाली आहे.’’