पीओपी मूर्तीवरील बंदी उठवावी यासाठी मूर्तीकार संघटनेची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात याचिका

पुणे – केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) मार्गदर्शक तत्त्वानुसार पीओपीच्या मूर्तींमुळे पाण्यातील प्रदूषण वाढते. त्यामुळे ‘सीपीसीबी’ने पर्यावरणास हानीकारक असल्यामुळे पीओपीच्या गणेशमूर्ती बनवण्यावर बंदी घातली आहे; मात्र शाडू मातीच्या मूर्तींमुळे अधिक प्रदूषण होत असल्याचा दावा ‘श्री गणेश मूर्तीकार उत्कर्ष मंडळा’कडून करण्यात आला आहे. (शाडूच्या मूर्ती पाण्यात लगेच विरघळत असल्यामुळे त्याने पर्यावरणाची कसलीही हानी होत नाही. ‘सृष्टी इको रिसर्च इन्स्टिट्यूट’ या संस्थेने केलेल्या पहाणीनुसारही गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होत नसल्याचा निष्कर्ष अभ्यासाद्वारे मांडला आहे. त्यामुळे मूर्ती नदीत विसर्जित केल्यामुळे प्रदूषण होते, हा दावा फोल ठरतो ! – संपादक) त्यांनी केलेल्या चाचणीच्या आधारावर पीओपीवरील बंदी रहित करण्यासाठी मूर्तीकार संघटनेच्या वतीने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एन्.जी.टी.) दावा नोंद केल्याची माहिती मंडळाच्या हमरापूर विभागाचे कार्यकारी सल्लागार अजय वैशंपायन यांनी दिली.

पीओपीच्या तुलनेत शाडू मातीच्या मूर्तीमुळे पाण्याचे अधिक प्रदूषण होते. पीओपीच्या मूर्ती विसर्जन केल्यावर पाण्याच्या ‘पी.एच्.’वर (हायड्रोजन आर्यन कॉन्सेन्ट्रेशन दर्शवणारे परिणाम) परिणाम होत नाही; पण शाडू मातीच्या मूर्तीमुळे पाण्यातील ‘पी.एच्.’ अल्प होऊन ते पाण्याला अम्लीय (सिटिक) आणि गढूळ करते, असा दावा करण्यात आला आहे. (चिकणमाती किंवा शाडूची माती यांपासून मूर्ती बनवावी असा शास्त्रविधी आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत पृथ्वीवर येणार्‍या श्री गणेशतत्त्वाच्या लहरी शाडू मातीच्या मूर्तीमध्ये ग्रहण करण्याची क्षमता अधिक असते. हिंदु धर्मशास्त्राने निसर्गाच्या रक्षणासह मानवाच्या सर्वांगीण उन्नतीचाही विचार केलेला आहे. याउलट पीओपी पाण्यात विरघळत नाही, त्यामुळे ते पर्यावरणपूरक नसून जलस्रोतांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे भाविकांनी कोणत्याही चुकीच्या दाव्यांना बळी न पडता शाडू मातीच्या मूर्तीलाच प्राधान्य द्यावे ! – संपादक)