रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून डोंबिवली, ठाणे येथील ‘विशाखा नृत्यालया’च्या संचालिका आणि विद्यार्थिनी यांनी दिलेले अभिप्राय
‘१७ ते २०.१.२०१८ या कालावधीत डोंबिवली येथील ‘विशाखा नृत्यालया’च्या संचालिका सौ. ज्योती शिधये आणि त्यांच्या नृत्यालयातील १२ विद्यार्थिनी रामनाथी आश्रमात आल्या होत्या. त्या वेळी आश्रम, तसेच सूक्ष्म-जगताविषयीचे प्रदर्शन पाहून आणि आश्रमात नृत्य केल्यावर त्यांना जाणवलेली सूत्रे अन् अभिप्राय येथे दिले आहेत. कालच्या लेखात आपण रामनाथी आश्रम पाहून जाणवलेली सूत्रे वाचली.
या लेखाचा मागील वाचण्यासाठी येथे क्लिक करा – sanatanprabhat.org/marathi/478209.html |
२. सूक्ष्म-जगताविषयीचे प्रदर्शन पाहून जाणवलेली सूत्रे
२ आ. ‘सूक्ष्म’ या शब्दाचा खरा अर्थ येथे समजला ! : ‘सूक्ष्म’ या शब्दाचा खरा अर्थ समजून मला आलेल्या अनुभूतींकडे बघण्याचा दृष्टीकोन पालटला. नव्हे, तो अजून खोल झाला. ‘लहानातली लहान गोष्टही पुष्कळ मोठी प्रचीती देऊन जाते’, हे लक्षात आले.’ – सौ. प्राजक्ता सचिन करंदीकर
२ इ. ‘प्रखर साधना केल्यावर अद्भुत परिवर्तन होऊ शकते’, याची जाणीव होणे : ‘सूक्ष्म-जगताचे प्रदर्शन हा माझ्यासाठी हा अतिशय आश्चर्याचा विषय होता. अशा गोष्टी कधी (सत्यात) असू शकतात, हे मला पूर्वी ठाऊकच नव्हते. तीव्र साधना केल्यावर असे अद्भूत परिवर्तन होऊ शकते. ‘साधना आणि नामजप यांमुळे व्यक्तीत साधकत्व येते’, याची मला सूक्ष्म-जगताचे प्रदर्शन पहातांना जाणीव झाली.’ – सौ. अलकनंदा मुखर्जी
२ ई. ‘आपल्या दैनंदिन जीवनावर लहान गोष्टींचाही कसा परिणाम होत असतो, हे कळले, तसेच आपले ‘विचार आणि मन’ यांचा आपल्या कार्यावर होणारा सूक्ष्म परिणाम यांची माहिती मिळाली.’ – कु. निशिगंधा विश्वास केतकर
२ उ. सकारात्मक ऊर्जेची अनुभूती येणे : ‘सूक्ष्म प्रदर्शन पाहून पुष्कळ सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आली. अधिक साधना आणि सूक्ष्म-जगताविषयीचा पुष्कळ खोलातील अभ्यास करायची आवड माझ्या मनात निर्माण झाली असून त्यासाठी प्रयत्न करणार आहे.’ – कु. भाविशा देढीया (नृत्य अलंकार), ठाणे, महाराष्ट्र.
३. आश्रमात नृत्य केल्यावर जाणवलेली सूत्रे
३ अ. नृत्याशी एकरूप होणे : ‘चित्रीकरण कक्ष (स्टुडिओ) पाहून प्रथम दडपण आले होते; परंतु नृत्याला आरंभ केल्यावर सर्व दडपण निघून गेले. आम्ही प्रेक्षकांसमोर नेहमीच नृत्य करतो; पण येथे प्रेक्षक म्हणून साधकच होते. त्यांच्या तोंडवळ्यावरील आनंद बघून आम्हाला नृत्य करायला स्फूर्ती मिळाली. ‘शिववंदना’ नृत्य करतांना आम्ही नृत्याशी एकरूप झालो आणि सहजतेने नृत्य करत होतो. ‘परशुराम नृत्यनाटिका’ करतांना शेवटी शेवटी माझा हात दुखतो; परंतु या वेळी तो दुखला नाही.’ – सौ. चारुशीला गोरे
३ आ. शिवाची अनुभूती येणे : ‘नृत्य करतांना पुष्कळ धार्मिक अनुभूती आल्या. ‘शिवो ऽ हं’ या गाण्यावर नृत्य करतांना ‘चहूबाजूंनी शिवलिंग असून ज्यामुळेे मी अंतर्मुख होत आहेे’, अशी अनुभूती आली. आश्रमाच्या सात्त्विकतेमुळे ही अनुभूती आली, असे वाटते.’ – सौ. अलकनंदा मुखर्जी
३ इ. श्रीरामाची अनुभूती येणे : ‘चित्रीकरण कक्षात (स्टुडिओमध्ये) गेल्यावर प्रसन्न वाटले. नृत्याला आरंभ केल्यावर अंगावर रोमांच येत होते. नृत्य सादर करतांना सगळीकडे चैतन्य जाणवत होते. ‘परशुराम’ ही नृत्यनाटिका सादर करतांना सूक्ष्मातून प्रत्यक्ष भगवान परशुराम दिसले. ‘श्रीरामचंद्र कृपालू’ हे भजन म्हणतांना स्वतःला विसरून नृत्य होत होते आणि समोर श्रीराम असल्याची अनुभूती आली. तेथील चैतन्यामुळे हे सर्व अनुभव झाले. आमचे भाग्य की, आम्हाला हे सर्व अनुभवता आले.’ – कु. चिन्मयी रवींद्र साळवी
३ ई. नृत्य करतांना भाव निर्माण होऊन ऊर्जेत वाढ होणे : ‘नृत्य करतांना पुष्कळच चैतन्यमय वाटत होते. एरव्ही नृत्य करतांना पुष्कळ दम लागतो; पण अंतिम नृत्य सादरीकरणाच्या वेळी येथे जराही दम लागला नाही. साधकांचा नृत्य बघतांनाचा भाव पाहून नृत्य करतांना अधिक ऊर्जा मिळत होती.’ – कु. विशाखा शिधये
३ उ. नृत्य करतांना दिव्य शक्तीचा अनुभव येणे : ‘नृत्याविषयी लिहितांना शब्दच सुचत नाहीत; कारण आम्ही रंगमंचावर (स्टेजवर) नृत्य करतो, तेव्हा ‘कसे होईल ?’, अशी भीती प्रत्येक वेळी मनात असते; परंतु येथे ‘शिववंदना’ सादर करतांना ‘त्या प्रवाहात कसे मिसळून गेलो ?’, हे कळलेच नाही. ‘आमच्या समोर कुठली तरी दिव्य शक्ती आहे’, याची अनुभूती आली. इतर वेळी तोंडवळ्यावरील हावभाव ठरवून होतात; परंतु येथे ते आपोआप होत होते. तेव्हा सूक्ष्म शक्तीचा अनुभव आला. नृत्य करतांना ‘स्वतः देवमय झालो आहोत’, असे वाटले. एक प्रकाशमयी ज्योत समोर दिसली आणि ती मनाला प्रसन्न करून गेली.’ – सौ. आल्पा सोनगिरे
३ ऊ. परशुरामांवर केलेल्या नृत्यनाटिका पाहून सगळ्यांच्याच डोळ्यांत अष्टसात्त्विक भाव जागृत झाल्याचे दिसणे : ‘नृत्य सादर करतांना ‘पुढचा पदन्यास (स्टेप) काय आहे ?’, हे मी पूर्ण विसरून जात होते; पण ‘ते सहज घडत होते’, असे जाणवले. आमची नृत्यनाटिका जशी रंगात येत होती, तशी नृत्याची प्रस्तुती संपेपर्यंत मी एका वेगळ्याच मनःस्थितीत होते. इतर ठिकाणी रंगमंचावरील सादरीकरणाच्या वेळी समोरच्या रसिक प्रेक्षकांची थाप मनाला भारावून टाकणारी असते; पण इथे साधकांमध्ये एवढी सकारात्मकता होती की, परशुरामांवर केलेल्या नृत्यनाटिका पाहून सगळ्यांच्याच डोळ्यांत अष्टसात्त्विक भाव जागृत झालेला दिसला. इथल्या वातावरणातील चैतन्य, स्पंदने आणि सात्त्विकता यांचा सखोल अभ्यास होत असतांना आम्ही सहज आवड म्हणून नाचतो, त्या ‘कथ्थक’ शैलीत पुष्कळ सकारात्मकता आहे, याची अनुभूती घेतली.’ – कु. स्वरूपा मकरंद भोंदे
३ ए. साधकांसमोर नृत्य सादर करतांना मनाला वेगळीच ऊर्जा मिळून प्रसन्नता जाणवणे : ‘मी रंगमंचावर नृत्य केले होते; परंतु अशा आध्यात्मिक वातावरणात संशोधनासाठी नृत्य करण्याची वेळ क्वचित्च येते आणि तो अनुभव इथे मिळाला. नृत्य सादर करतांना नेहमीच मनात धाकधूक असते; परंतु येथे सर्व साधकांसमोर नृत्य करतांना मनाला वेगळीच ऊर्जा मिळत होती आणि त्यातून मनाला प्रसन्नता मिळत होती. नृत्य करतांना प्रेक्षकांच्या डोळ्यांतील उत्सुकता अधिक ऊर्जा आणि प्रेरणा देत होती. एकदा नृत्य केल्यावर संशोधनाच्या दृष्टीने पुन्हा एकदा नृत्य सादर केले. नृत्याची लय अधिक असल्याने मला थोडा दम लागला; परंतु पुन्हा सादरीकरणाला आरंभ केल्यावर पूर्ण थकवा नाहीसा झाला आणि शरिरात पुन्हा ऊर्जा संचारित झाली.’ – कु. निशिगंधा विश्वास केतकर
३ ऐ. नृत्य करतांना ‘दैवी शक्ती वास करत आहेत’, हे अनुभवता येणे : ‘आमच्या गुरूंमुळे आम्हाला वेगळा अनुभव घेता आला. इतर वेळी सादर केलेले नृत्य आणि येथे केलेले नृत्य यांत पुष्कळ भेद जाणवतो. भजन प्रस्तुत केले, तेव्हा ‘रामाची जीवनकथा तेथे प्रत्यक्ष घडत आहे आणि श्रीरामच आपल्याकडून नृत्य सादर करून घेत आहे’, असे वाटले. ‘येथे दैवी शक्ती वास करत आहेत’, याचा अनुभव घेता आला.’ – कु. श्रुती गद्रे
(समाप्त)
|