संगीत कलेला आरंभ करतांना केलेली मानसपूजा, प्रार्थना आणि स्वतःत जाणवलेले पालट !
१. संगीताच्या सेवेला आरंभ करण्यापूर्वी मानसरित्या कैलास पर्वतावर जाऊन केलेली शिवपूजा !
अ. ‘मी संगीताची सेवा चालू करण्यापूर्वी मानसपूजा करत असे. त्या वेळी ही सेवा करणार्या सर्व साधकांना मी मानसरित्या कैलास पर्वतावर घेऊन जाते. तिथे गेल्यावर आम्ही सर्व साधक शिवाला ‘तुझ्या भावलहरी आम्हाला ग्रहण करता येऊ दे’, अशी प्रार्थना करतो. त्यानंतर सर्व जण एकत्रितपणे ध्यानस्थ शिवाची मानसपूजा करतो. ‘हे भगवान शिवशंभो, ‘तू आणि परात्पर गुरुमाऊली एकच आहात’, असे आम्हाला वाटते. पहाटे उठून स्नान करून जेव्हा आम्ही तुझ्यासमोर येऊन पद्मासनात बसतो, तेव्हा तू ध्यानावस्थेत असतोस. जेव्हा आम्ही तुझ्या समोर सप्तसुरांचे आलाप घ्यायला आरंभ करतो, तेव्हा आमचे संगीत ऐकून तू तुझे नेत्र उघडून आमच्याकडे पाहून स्मित करतोस. भक्तांसाठी एवढ्या उच्च अवस्थेतून बाहेर येणार्या भगवान शिवाला आम्ही वंदन करतो.’
आ. त्यानंतर भगवान शिव आम्हाला संगीताविषयी मार्गदर्शन करण्यास आरंभ करतो; पण तो काय सांगत आहे, याकडे आमचे लक्ष नसते. आम्ही केवळ त्याच्या कपाळावरील भस्म आणि वार्याने उडणारी त्याची जटा, या त्याच्या रूपाकडे पहात असतो. मार्गदर्शन संपल्यावर शिव विचारतो, ‘कळलं का ?’ त्या वेळी तेथे असलेली वाद्ये, त्यांचे झंकार, ताल, पानांची सळसळ, बांगड्यांचा आणि घुंगरांचा आवाज या नादांची त्या नादब्रह्माकडे म्हणजे शिवाकडे जाण्याची इच्छा असल्याचे जाणवते. ते सर्व नाद ‘शिवोऽहम् ।’, म्हणजे ‘मी शिव आहे’, असे म्हणत असल्याचे जाणवते.
इ. हे भगवंता, हा ज्ञानप्रवाह सतत चालू रहावा, यासाठी आम्हा संगीत विभागातील सर्व साधकांना तूच शिकव. आम्हाला न स्वरांचे ज्ञान, ना मुद्रांचे ! आम्हाला तालाचे गणितही कळत नाही. आम्हाला काहीही येत नाही. हे कृपासागरा, तूच प्रत्येक क्षणी आम्हाला शिकव.’
ई. त्यानंतर मी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करते, ‘हे शिवस्वरूप गुरुमाऊली, तुम्ही गीतातील ‘ध्रुवपदा’प्रमाणे आहात. जसे एक पद झाल्यावर आपण परत ध्रुवपदाकडे येतो, तशी आम्हाला पुनःपुन्हा तुमच्याकडे येण्याची ओढ लागलेली आहे. जसे ध्रुवपदातील तिहाई (तीन वेळा उच्चार केल्यावर) देऊन संगीत संपते, तसे आम्हाला तुमच्यात विलीन होता येऊ दे. हे गीत विसरून शिवानंदात मग्न होता येऊ दे.’
२. मनातील विचारांत झालेले पालट
अ. परात्पर गुरु डॉक्टर, पूर्वी मी कुठलीही मानसपूजा करतांना त्या त्या देवतांना अलंकारादि शृंगार करणे, त्यांना भोजन देणे इत्यादी सर्व करायचे. आता मानसपूजा करतांना हे काहीच करायची इच्छा रहात नाही. ‘केवळ ध्यानस्थ शिवाकडे पहात रहावे’, असे मला वाटते. या आधी मी श्रीकृष्णासंबंधी कथा आठवून त्यात रमत असे. आता ‘केवळ त्याचा नामजप करावा, त्याचे तत्त्व अनुभवावे’, असे मला वाटते. आता ‘मी सगुणातून पुढच्या टप्प्याला जात आहे’, असे मला वाटते.
आ. पूर्वी माझ्या मनात पुष्कळ विचार यायचे. मला अनेक बौद्धिक प्रश्नही असायचे. गुरुमाऊलीनेच मला या प्रश्नांच्या जाळ्यातून बाहेर काढले. त्यामुळे वरीलप्रमाणे माझ्या मनाची विचार प्रक्रिया होते. ही देवाचीच कृपा आहे.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना केलेली प्रार्थना !
मला आद्य शंकराचार्यानी केलेल्या प्रार्थनेप्रमाणे गुरुदेवांच्या चरणी पुढील प्रार्थना करावीशी वाटते – ‘देवा, तुझेच नाम माझ्या मुखी सदैव असू दे. आता मला कसलेही ज्ञान घेण्याची इच्छा नाही. संगीत शिकण्याचीही इच्छा नाही. जाणून घेण्यासारखे असे माझ्यासाठी काहीच उरले नाही. ‘केवळ तुला पहात रहावे आणि तुझ्याशी एकरूप व्हावे’, एवढेच वाटते. देवा तुझेच नाम माझ्या मुखी सदैव असू दे.’
न मोक्षस्याकाङ्क्षा भवविभववाञ्छापि च न मे ।
न विज्ञानापेक्षा शशिमुखि सुखेच्छापि न पुनः ।
अतस्त्वां संयाचे जननि जननं यातु मम वै ।
मृडानी रुद्राणी शिव शिव भवानीति जपतः ॥
– आद्य शंकराचार्य, (देव्यापराधक्षमापन स्तोत्र, श्लोक क्र. ८)
अर्थ : ‘हे चंद्रमुखी माते, मला मोक्षाची इच्छा नाही, सांसारिक वैभवाची लालसा नाही, विज्ञान किंवा सुखाची अभिलाषा नाही; म्हणून माझे सारे आयुष्य, ‘मृडानी, रुद्राणी, शिव शिव भवानी’ अशा (तुझ्या) नावांचा जप करत जावो’, असे मी तुझ्याकडे मागणे मागतो.’
– कु. रेणुका कुलकर्णी, सनातन आश्रम, गोवा. (३.४.२०१८)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |