कोल्हापूर पोलिसांनी तात्काळ केलेल्या साहाय्यामुळे मिळाले गायीला जीवदान !
कोल्हापूर पोलिसांची स्तुत्य कृती !
कोल्हापूर – येथील ‘हॉकी स्टेडियम’ परिसरात एक गाय पत्र्याच्या कंपाऊंडमधून बाहेर येतांना दोन्ही पत्र्याच्या मध्ये तिचे तोंड अडकले. जवळपास १५ मिनिटे ही गाय त्या ठिकाणी अडकून होती. एका व्यक्तीचे त्याकडे लक्ष गेले आणि त्यांनी जवळच असलेल्या पोलिसांना याविषयी माहिती दिली. या वेळी वाहतूक पोलीस कर्मचारी विलास भारती, विठ्ठल जरग, तानाजी सुंबे, महेश बांगर यांच्यासह होमगार्ड सचिन पाटील, कुमार तांबेकर, विकास कांबळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या सर्वांनी मिळून दोन्ही पत्रे बाजूला केले आणि गायीला जीवदान दिले. थोडा उशीर झाला असता, तर धारधार पत्र्यामुळे कदाचित गायीचा मृत्यू झाला असता. पोलिसांनी केलेल्या कृतीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.