ख्रिस्ती ‘राजा’श्रय !
इस्लामीकरणाकडे झुकत चाललेला बंगाल आणि ख्रिस्त्यांचा बोलबाला वाढत आहे असा आंध्रप्रदेश येथील सत्तापिपासू शासकांमधील साम्य दर्शवणारे उदाहरण नुकतेच घडले. बंगालमधील नारदा घोटाळ्याप्रकरणी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या ४ वरिष्ठ नेत्यांना अटक झाल्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीव्र संताप व्यक्त केला. अटकेच्या निषेधार्थ त्यांच्या शेकडो समर्थकांनी कोलकात्यातील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या कार्यालयासमोर हिंसक आंदोलन केले. ‘आमचे सर्व नेते निर्दोष असल्या’ची बांग या वेळी ठोकण्यात आली. दुसरीकडे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावरील भ्रष्टाचाराची प्रकरणे आणि राज्यात सातत्याने होत असलेले हिंदु धर्मावरील आघात यांच्या विरोधात आवाज उठवणारे सत्ताधारी पक्षातीलच खासदार रघुराम कृष्णम् राजू यांना अटक करण्यात आली. आंध्र पोलिसांनी त्यांच्यावर ‘थर्ड डिग्री’चे अत्याचार केल्याच्या वार्ता आणि छायाचित्रेही प्रसिद्ध झाली. सत्ता काबीज ठेवण्यासाठी नि आपल्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे आहेत, हे सिद्ध करण्यासाठी आपल्या रस्त्यात येणारे सर्व प्रकारचे अडथळे नष्ट करण्याचे येनकेन प्रकारेण प्रयत्न चालवणे, हे या दोन्ही घटनांतील साम्य होय.
पंथकेंद्रित सत्ताकारण !
सत्ताकारण करण्यामागील महत्त्वाचे एक कारण म्हणजे सरकारी स्तरांवरून अनुक्रमे इस्लाम आणि ख्रिस्ती पंथ पुढे रेटण्यासाठी बिनदिक्कतपणे प्रयत्न चालवण्याची व्यवस्था करणे होय. बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या रणधुमाळीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली झालेले ‘हिरवे’ राजकारण आणि निकालानंतर झालेली हिंदुविरोधी हिंसा हा त्याचा एक पैलू होता. आंध्रप्रदेशचा विचार करता ख्रिस्ती पंथाला ‘राजाश्रय’ देण्याच्या विरोधात उभे ठाकलेले खासदार रघुराम कृष्णम् राजू हा अडथळा दूर करण्याचा सत्ताधिशांचा प्रयत्न होय. राज्य सरकारचे ख्रिस्तीप्रेम तर इतके की, स्वपक्षातील एका खासदाराच्या विरोधात काठी उगारण्यात आली. त्यामुळे आंध्रप्रदेशमध्ये सध्या काय चालू आहे ? याचा बारकाईने मागोवा घेणे देशाच्या अखंडतेच्या अनुषंगाने महत्त्वाचे ठरणार आहे.
राजकीय ‘ख्रिस्ती’ इतिहास !
ख्रिस्त्यांचे आश्रयस्थान होत चाललेल्या या स्थितीचा उदय खरेतर ३०० वर्षांपूर्वी झाला होता. वर्ष १७१५ मध्ये रेड्डी नावाच्या हिंदु समुदायातील काही कुटुंबांनी ख्रिस्ती पंथ पहिल्यांदा स्वीकारला. पुढे वर्ष १७५० नंतर ब्रिटिशांनी ओळखले की, रायलसीमा म्हणजे आजच्या दक्षिण आंध्राच्या ४ जिल्ह्यांच्या क्षेत्रातील हिंदूंना आपल्याकडे वळवण्यासाठी त्यांच्यातील प्रभावी नेतृत्व करणार्या लोकांना आपल्याकडे ओढावे लागेल. हा कुटील डाव यशस्वी झाल्याने येथे ख्रिस्त्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली. दक्षिण आंध्रातून धर्मांतरित झालेले ख्रिस्ती उत्तरेत स्थलांतर झाल्याने तेथेही या लोकांची संख्या वाढत गेली. ब्रिटीशकालीन मद्रास प्रांतातील हे संपूर्ण क्षेत्र म्हणजे आजचे तेलंगाणा, आंध्रप्रदेश आणि दक्षिण ओडिशा होय.
खंडित आंध्रप्रदेशचे आजचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या वंशजांचा विचार केल्यास त्यांचे हिंदु पणजोबा वेंकट रेड्डी यांनी वर्ष १९४२ मध्ये ख्रिस्ती पंथ स्वीकारला. आजोबा राजा रेड्डी यांनी १९७० च्या दशकात राजकारणात प्रवेश केला. तेव्हापासून त्यांच्या घराण्याचे भ्रष्टाचार आणि ख्रिस्तीधार्जिणेपणा यांविषयी होत असलेले गंभीर आरोप राज्यात सर्वश्रुत आहेत. याला व्यापक स्वरूप मात्र जगनमोहन रेड्डी यांचे वडील आणि काँग्रेसी नेते वाय.एस्.आर्. म्हणजे येदुगिरी संदिंती उपाख्य सॅम्युएल राजशेखर रेड्डी यांच्या सत्ताकाळात मिळाले. राजशेखर रेड्डी अखंड आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री असतांना वर्ष २००५ मध्ये तिरुमला तिरुपति येथे मोठे चर्च उभारण्याचा घाट घातला गेला. यास जगभरातील हिंदूंकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने त्यांना हे पाऊल मागे घ्यावे लागले. त्यांच्या सत्ताकाळात तिरुमला येथील ७ डोंगरांच्या पवित्र क्षेत्रातील भोळ्याभाबड्या हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्नही चालवण्यात आला. केवळ ख्रिस्त्यांना राजाश्रयच नाही, तर रेड्डी यांच्यावर सहस्रावधी कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे अनेक आरोपही समोर आले.
हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी उभे रहा !
राजशेखर रेड्डी यांच्या अपघाती मृत्यूनंतर १० वर्षांनी सत्ता प्राप्त केलेले त्यांचे पुत्र म्हणजे खंडित आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी तिच री पुढे ओढत आहेत, हे वेगळे सांगायला नको. त्यांच्या आलिशान बंगल्याच्या इमारतीवर ख्रिस्त्यांचा मोठा क्रॉस लावलेला आहे. एका धर्मनिरपेक्ष राष्ट्रातील एका मुख्यमंत्र्याच्या घरावर असे धार्मिक चिन्ह असणे, हे भारतीय धर्मनिरपेक्षतेसमोर आव्हान नव्हे का ? आज त्यांच्याच पक्षातील खासदार रघुराम कृष्णम् राजू हे त्यांच्या विरोधात आरोप करत आहेत. या आरोपांमध्ये पुष्कळ तथ्य असल्याचे मानले जात आहे. काही मासांपूर्वी आंध्रप्रदेशातील अनेक मंदिरांतील मूर्तींची नासधूस आणि चोर्यांची प्रकरणे समोर येत होती. सरकारी टेंडरद्वारे येथे अनेक चर्च उभारण्याचा प्रयत्न होत आहे. राजू यांनी याचा तीव्र विरोध करत याविषयी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून हे सर्व थांबवण्यासाठी पावले उचलण्याची विनंती केली. कुण्या हिंदुत्वनिष्ठ नेत्याने नव्हे, तर धर्मनिरपेक्ष म्हणवणार्या पक्षातील खासदाराने म्हणजे राजू यांनी आंध्रातील मंदिरांवर वारंवार होणार्या आक्रमणांचा विषय संसदेत मांडला. ‘स्ट्रिंग रिवील्स’ या सध्या लक्षावधी लोकांमध्ये प्रसिद्ध होत असलेल्या यू ट्यूब चॅनलने नुकतीच राजू यांची मुलाखत घेतली. त्यात राजू म्हणतात, ‘‘कागदोपत्री आंध्रप्रदेशात केवळ २ टक्के ख्रिस्ती आहेत; परंतु आज येथील २५ टक्के म्हणजे दीड कोटी लोकसंख्या ख्रिस्ती आहे.’’ या सर्वांमागे सध्याचे राज्य सरकारच उत्तरदायी असल्याचे राजू यात न विसरता सांगतात. राजू यांच्या या वक्तव्यांमुळेच त्यांच्यावर सरकारी रोष आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता न लगे !
आज आपण आंध्रातील या भयावह वास्तवाकडे दुर्लक्ष केल्यास इतिहास मात्र आपल्याला क्षमा करणार नाही. चौथ्या शतकात युरोपात बहुसंख्यांक असलेल्या ‘पगान’ नावाच्या मूर्तीपूजक समुदायावर अनेक आघात करण्यासह अनेकांना जिवंत जाळले, तर अनेकांचे बलपूर्वक धर्मांतर केले. इतिहासतज्ञांच्या मते ईस्टर आणि नाताळ हे मूळचे पगान धर्मातील सण होत. आज जगाच्या नकाशावर एकही पगान व्यक्ती शेष नाही. हिंदूंची तशी स्थिती होऊ नये, यासाठी त्यांनी संघटित होणे आणि रघुराम कृष्णम् राजू यांच्यासारख्या हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी ठामपणे उभे रहाणे काळाची आवश्यकता आहे, हे आतातरी आपण जाणायला हवे !