दरभंगा (बिहार) येथी पीएम् केअर फंडातून मिळालेले २५ व्हेंटिलेटर ९ मासांपासून विनावापर पडून !

ड्राय रन प्रक्रिया अयशस्वी झाल्यामुळे वापर होत नसल्याचा रुग्णालयाचा दावा !

या पूर्ण प्रक्रियेत चूक कुणाची ? ज्याच्याकडून हे राहिले असेल, त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक !

दरभंगा (बिहार) – कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये व्हेंटिलेटर्स, रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन, लस आदींचा तुटवडा जाणवत आहे. केंद्राकडून राज्यांना शक्य ते साहाय्य केले जात असतांना दरभंगा येथे ‘पीएम् केअर्स फंड’मधून देण्यात आलेले २५ व्हेंटिलेटर्स विनावापर पडले आहेत. गेल्या ९ मासांमध्ये त्यांचा एकदाही वापर केला गेला नसल्याचे सांगितले जात आहे.

दरभंगा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मणि भूषण यांनी याविषयी सांगितले की, आयसीयू सेटअपसह व्हेंटिलेटर्स मिळाले, ही गोष्ट सत्य आहे. या व्हेंटिलेटर्सना वापरासाठी सिद्ध करण्यात येत होते; मात्र ड्राय रन प्रक्रिया यशस्वीरित्या चालू होत नसल्यामुळे हे व्हेंटिलेटर्स वापरले नाहीत. तसेच या ठिकाणी ऑक्सिजन प्लांंट चालू करण्यात आले आहेत. ड्राय रन प्रक्रियेची चाचणी पुन्हा करण्यात येत असून लवकरच हे व्हेंटिलेटर्स चालू होऊन वापरात येतील. ड्राय रन प्रक्रिया योग्य पद्धतीने चालू होणे अत्यंत महत्त्वाचे असते. ही प्रक्रिया योग्य पद्धतीने चालू झाली नाही, तर रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.