उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला ५ टी.एम्.सी. पाणी देण्याचा निर्णय मागे घ्यावा !
शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांची मागणी
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला ५ टी.एम्.सी. पाणी देण्याचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा रक्तरंजित आंदोलनाला जिल्हा सिद्ध होईल, अशी चेतावणी शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी दिली आहे. त्यांच्या चिकमहूद येथील निवासस्थानासमोर हलगीनाद आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी आमदार शहाजी पाटील पुढे म्हणाले की,
१. ‘उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समिती’च्या वतीने शेतकरी नेते माउली हळणवर आणि दीपक भोसले यांनी सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन या निर्णयाच्या विरोधात शेतकर्यांमध्ये जागृती चालू केली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या काळात शरद पवार यांनी एकाच दिवशी ९ औद्योगिक वसाहती केवळ पुणे जिल्ह्याला दिल्या. उजनीचे पाणी बारामतीच्या औद्यागिक वसाहतीसाठी नेले, तसेच पिण्यासाठी नेले. पूर्वी तुम्ही उजनीचे पाणी बारामतीला भरभरून नेलेच आहे. शेष राहिलेले ५ टी.एम्.सी. म्हणजे संपूर्ण धरणच पुण्याला घेऊन जा.
२. सत्ता मिळाल्यानंतर प्रत्येक वेळी शरद पवार यांनी बारामतीसाठी अनेक विकासाच्या भरभरून योजना राबवल्या आहेत. उजनी धरणातून ५ टी.एम्.सी. पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून अचानकपणे घेतलेला आहे. त्यामुळे शासनाने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा.