सिंधुदुर्ग जिल्ह्यात चक्रीवादळामुळे वीज वितरण कंपनीची पुष्कळ हानी
|
सिंधुदुर्ग – ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडे आणि फांद्या पडल्यामुळे वीजवाहिन्या तुटून वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक गावे गेले २ दिवस अंधारात आहेत. वीज वितरण आस्थापनाकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात असून अतिरिक्त मनुष्यबळ मागवण्यात आले आहे.
अजूनही काही प्रमाणात वादळी वारे चालू असल्याने झालेल्या हानीची पहाणी करण्यात आलेली नाही. वादळाची पूर्वसूचना मिळाल्यामुळे वीज वितरण आस्थापनाने पुरेसे साहित्य, तसेच आवश्यक मनुष्यबळाची तरतूद केली आहे. सद्य:स्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे १ लाख ७५ सहस्र वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे, एकूण २४ वीज उपकेंद्रे बंद पडली आहेत.
जनतेला संयम बाळगण्याचे आवाहन
चक्रीवादळामुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीजवितरण आस्थापन प्रयत्न करत असून सद्य:स्थितीत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन चालू करण्यात आले आहे. तथापि जनतेने संयम बाळगावा, असे आवाहन वीज वितरण आस्थापनाकडून करण्यात आले आहे.
वीजपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी गावातून स्वयंसेवक उपलब्ध करून देण्याचे आवाहन
सावंतवाडी – चक्रीवादळामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात वीज वितरण आस्थापनाची हानी झाली आहे. त्यामुळे वीज व्यवस्था पूर्ववत् करण्यासाठी तालुक्यातील सरपंचांनी स्वतः पुढाकार घेऊन आपापल्या गावात स्वयंसेवक उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी केले आहे.
मधमाशांच्या आक्रमणात वीज कर्मचारी गंभीर घायाळ
वैभववाडी – शहरातील वीज खांबावर चढून दुरुस्तीचे काम करत असतांना मधमाशांनी केलेल्या आक्रमणात वीज वितरणचे कर्मचारी रविकांत बाणे गंभीर घायाळ झाले आहेत. बाणे यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले आहे.