गोव्यात दिवसभरात ४५ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर १ सहस्र ३५८ नवीन रुग्ण

पणजी – गोव्यात १८ मे या दिवशी ४५ रुग्णांचा मृत्यू झाला. यांपैकी गोमेकॉमधील २६, तर दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील ११ रुग्णांचा मृत्यू झाला आणि उर्वरित मृत्यू अन्य आरोग्य केंद्रात झाले. यामुळे कोरोनामृतांची संख्या २ सहस्र १९७ झाली आहे. दिवसभरात कोरोनाशी संबंधित ३ सहस्र ८९८ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १ सहस्र ३५८ नवीन रुग्ण आढळले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण ३४.८३ टक्के झाले आहे. दिवसभरात ३ सहस्र १२० रुग्ण कोरोनापासून बरे झाले, तर कोरोनाबाधित १९९ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. यामुळे राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या घटून २३ सहस्र ९४६ झाली आहे.

गोवा प्रवेशासाठी कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्राचे निर्बंध हटवण्याविषयीची शासनाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

पणजी, १८ मे (वार्ता.) – इतर राज्यांतून गोव्यात येणार्‍यांनी ७२ घंटे आधी घेतलेले कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र सादर करण्याविषयीचे निर्बंध हटवावेत, अशी मागणी गोवा शासनाने मुंबई उच्च न्यायालयाकडे याचिकेद्वारे केली होती; परंतु ही मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे, अशी माहिती अधिवक्ता निखिल पै यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘सध्या हे निर्बंध असावेत; मात्र भविष्यात परिस्थिती पाहून आवश्यकता भासल्यास शासन पुन्हा याचिका प्रविष्ट करू शकते, असे उच्च न्यायालयाने सांगितले आहे.’’