‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या तडाख्यात महाराष्ट्रात ११ जणांचा मृत्यू, तर १२ सहस्र घरांची हानी ! – विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसनमंत्री
नागपूर – ‘राज्यात ‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या तडाख्यात ११ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये काही जण बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे, तर १२ सहस्र घरांची हानी झाली आहे. आतापर्यंत १५ सहस्र लोकांना सुरक्षित जागेवर हालवले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हानीत वाढ होण्याची शक्यता आहे. वादळाच्या हानीभरपाईसाठी निकषाबाहेर जाऊन आघाडी सरकार साहाय्य करण्याचा प्रयत्न करणार आहे’, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी १८ मे या दिवशी पत्रकारांशी बोलतांना दिली.
ते पुढे म्हणाले की, चक्रीवादळामुळे झालेली हानी मोठी असून यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. याविषयी सर्व जिल्हाधिकार्यांकडून ‘ऑनलाईन’ बैठकीतून माहिती घेणार असून तातडीने सविस्तर पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. रात्रीपर्यंत १३० गावांशी संपर्क तुटला होता. आज १० ते १२ गावांचा संपर्क होत आहे. वादळ आणि विद्युत् पुरवठा खंडित झाल्याने संपर्क करण्यास अडचणी येत होत्या.
कोकण किनारपट्टीवर ४ जिल्ह्यांतील ३०० गावांना नेहमीच वादळाचा फटका बसतो. त्यामुळे तिथे वीजयंत्रणा भूमीगत करण्याचे विचाराधीन आहे. याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चाही झाली आहे. येत्या २ दिवसांत मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन लवकरात लवकर साहाय्य कसे पोचवता येईल, यासाठी प्रयत्न केले जातील. ‘एस्.डी.आर.एफ्.’ आणि ‘एन्.डी.आर्.एफ्.’च्या निकषानुसार केंद्र सरकारने साहाय्य करावे. हानी झालेल्या भागांचा केंद्र सरकारने पथक पाठवून त्याचा आढावा घ्यावा, अशी विनंती केंद्र सरकारला पत्राद्वारे करणार आहोत, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.