संभाजीनगर येथे कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या निराधार बालकांच्या शोधासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना !
जिल्ह्यातील ४६३ ‘ग्रामबाल संरक्षण समित्या’ कार्यरत !
संभाजीनगर – कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या निराधार बालकांचा शोध घेत त्यांना आधार देण्यासाठी राज्यशासनाने ‘टास्क फोर्स’ स्थापण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय सक्रीय झाले आहे. या कार्यालयाच्या अखत्यारित जिल्ह्यातील गावांत ४६३ ‘ग्रामबाल संरक्षण समित्या’ कार्यरत आहे. समित्यांना निराधार झालेल्या बालकांचा शोध घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. गावपातळीवरील शोध घेऊन झाल्यानंतर ९ तालुके बालसंरक्षण समित्यांचा अहवाल जिल्हास्तरावरील समितीस सादर करणार आहेत. जिल्ह्यातील माहितीचे संकलन झाल्यानंतर निराधार झालेल्या बालकांना आवश्यक त्या सोयीसुविधा, संरक्षण आणि त्यांचे इतर हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय आराखडा सिद्ध करणार आहे. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका यांच्याकडून दोन्ही पालक मृत झालेल्या मुलांची सूची मागण्यात येत आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे महिला बालविकास कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
प्रतिमहा १ सहस्र रुपये देण्यात येणार !
शासनाच्या वतीने राबवण्यात येणारी ही योजना अतिशय चांगली असून यासंदर्भात नातेवाईक आणि आजूबाजूचे नागरिक यांनी स्वतःहून अशा मुलांची नावे द्यावीत. अशा मुलांचे कुणी नातेवाईक त्यांचा सांभाळ करत असतील, तर त्या मुलांना प्रतिमहा १ सहस्र रुपये देण्यात येणार आहेत. यापूर्वी हे साहाय्य ४५० रुपये होते. कोरोनामुळे यात वाढ करण्यात आली.
– हर्षा देशमुख, महिला बालविकास अधिकारी