कोवळ्या मनांच्या धर्मांतराचा घाट !
तमिळनाडूमध्ये ७ वर्षीय बालिकेवर धर्मांतरासाठी दबाव आणल्याप्रकरणी २ ख्रिस्ती महिलांविरुद्ध तक्रार करण्यात आली. याच मतदारसंघात काही मासांपूर्वी एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिका आणि एक शिक्षिका विद्यार्थ्यांच्या धर्मांतरासाठी प्रयत्नरत असल्याची तक्रार करण्यात आली होती. संस्कारक्षम वयात हिंदु विद्यार्थ्यांवर धर्मांतराचे आघात होणे, ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे. आजमितीला अशा किती मुलांचे धर्मांतर झाले असेल ? याची गणतीच नाही. विविध आमिषे दाखवून हिंदु मुलांना चर्चमध्ये बोलावले जाते. येथून धर्मांतराच्या जाळ्यात ओढणे चालू होते. ‘स्लो पॉयझन’प्रमाणे हिंदुद्वेष भिनवून मुलांची कोवळी मने कलुषित केली जातात. हीच मुले पुढे एकतर धर्मांतरित होऊन हिंदु देवतांना तुच्छ लेखतात किंवा प्रतिसप्ताह चर्चमध्ये जाणे तरी चालू ठेवतात. अशा प्रकारे धर्मांतराच्या कारवाया राजरोसपणे आणि उघडपणे होणे, हे भयावह असून ख्रिस्त्यांना कुणाचा धाक नसल्याचे दर्शक आहे.
ख्रिस्त्यांकडून हिंदूंचे होणारे धर्मांतर ही गेल्या अनेक दशकांपासूनची समस्या आहे. हे एक मोठे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र असून हिंदूंमधील धर्माभिमानाचा अभाव आणि राजकीय उदासीनता यांमुळे ते फोफावले आहे. परिणामी धर्मांतराच्या समस्येने आता उग्र रूप धारण केले आहे. या षड्यंत्राला विरोध करणार्या हिंदुत्वनिष्ठांचा आवाज अनेकदा दाबण्यात आला. स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांच्यासारख्या हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करण्यात आल्या. धर्मांतराच्या विरोधात आवाज उठवणारे आंध्रप्रदेशातील खासदार रघुराम कृष्णम् राजू यांचा पोलीस कोठडीत छळ झाल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. आंध्रप्रदेशमधील ‘तिरुपति तिरुमला देवस्थान मंडळा’ने मंदिरातील दागिन्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा राजू यांनी त्याला विरोध केला होता. वाळूच्या विक्रीवरूनही त्यांनी मंदिर प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला होता. याचा डूख धरून कथित राजद्रोहाचा आरोप लावून खासदार राजू यांचा छळ चालवल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे धर्मांतराला राजकीय संरक्षण मिळत असल्याचे एक प्रकारे या घटनेतून स्पष्ट होते. ईशान्येकडील राज्यांपाठोपाठ महाराष्ट्र, तमिळनाडू, केरळ आणि आंध्रप्रदेश या राज्यांतही धर्मांतर करणार्या ख्रिस्ती मिशनर्यांनी हातपाय पसरले आहेत. आज पूर्वांचल पूर्णत: ख्रिस्तमय झालेला आहे. कोरोनासारख्या भयंकर आपत्तीचा अपलाभ घेऊन ‘गेल्या वर्षभरात १ लाख हिंदूंचे धर्मांतर १ वर्षात केले; जे गेल्या २३ वर्षांत केले नाही’, असे स्वतःच एका ख्रिस्ती संघटनेने घोषित केले आहे. याविषयी इंदूर येथील श्री अखंडानंद आदिवासी गुरुकुल आश्रमाचे महामंडलेश्वर आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वतीजी महाराज यांनी ‘कोरोनाकाळात ख्रिस्त्यांकडून होणारे धर्मांतर हा मानवतेला कलंक आहे’, अशा कडक शब्दांत ख्रिस्त्यांची धर्मांधता उघड केली.
मानवतेला कलंक !
आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वतीजी महाराज यांचे विधान महत्त्वपूर्ण असून ख्रिस्त्यांच्या तथाकथित मानवतावादाचा बुरखा फाडणारे आहे. भारतात मदर तेरेसांपासून गोरगरिबांच्या सेवेच्या नावाखाली यथेच्छपणे धर्मांतराचे प्रकार चालत आले आहेत. आज कोरोनाच्या स्थितीचा अपलाभ घेऊनही हाच प्रकार चालू आहे. मध्यंतरी गोवा येथे एका पाद्य्राने उघडपणे ‘भाजप हा ख्रिस्तीविरोधी पक्ष आहे. भाजपला मत देणार्याला ‘गॉड’ दंडित करेल. भाजपचे अमित शहा हे सैतान आहेत. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना ‘गॉड’च्या कोपामुळेच कर्करोग झाला’, अशी अनेक राजकीय विधाने केली होती. आता तमिळनाडूमधील प्रकरणात अल्पवयीन मुलीला ‘ख्रिस्ती धर्म न स्वीकारल्यास तुझ्या आई-वडिलांचा आजारी पडून मृत्यू होईल आणि ते भुतांच्या कह्यात जातील’, अशी भीती दाखवण्यात आली. अशी भंपक विधाने तथाकथित बुद्धीधार्जिणे पुरो(अधो)गामी कसे चालवून घेतात ? विवेकवादाची चिकित्सा करणार्यांच्या मेंदूच्या कसोटीवर ती उतरतात तरी कशी ? अर्थात् ‘हिंदू तेथे ओरड आणि अन्य धर्मीय तेथे सोयीस्कर मौन’ हा ज्यांचा ‘अजेंडा’ आहे, त्यांच्या (अ)विवेकी बुद्धीला याचे वावडे नसते, हेच यातून स्पष्ट होते !
‘धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर’ हे मर्म जाणणे आवश्यक !
ख्रिस्त्यांमध्ये धर्मांतर करण्यासाठीची निडरता कुठून येते ? याचे मूळ शोधणे ही समस्या रोखण्यासाठी आवश्यक आहे. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार केल्याचा, तसेच राजकीय नेत्यांनी मतांसाठी ख्रिस्त्यांना धर्मांतर करण्यास मोकळे रान दिल्याचा हा परिपाक आहे. त्यामुळे संपूर्ण देशात ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करणे अत्यावश्यक झाले आहे. धर्मांतराचा हेतू ठेवून कार्यरत असलेल्या कावेबाज ख्रिस्त्यांना वेळीच कठोर शासन झाले, तर अशा प्रकारांना आळा बसेल. ख्रिस्ती संघटितपणे धर्मांतराच्या कारवाया चालू ठेवतात, याउलट हिंदू विखुरलेले आहेत. त्यामुळे ही समस्या रोखण्यासाठी हिंदूसंघटनही अपरिहार्य असल्याचे लक्षात येते. धर्मांतर करणार्या ख्रिस्त्यांची डाळ शिजू द्यायची नसेल, तर प्रत्येक हिंदु हा धर्माभिमानाने भारित हवा. ख्रिस्त्यांच्या भूलथापांना सडेतोड प्रत्युत्तर देऊन त्यांना परतवून लावण्याचा बाणेदारपणा येण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण द्यायला हवे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनीही इंग्रज अन् पोर्तुगीज यांच्याकडून गोव्यात होणार्या धर्मांतराच्या विरोधात लढा दिला. त्यांनी इंग्रज आणि पोर्तुगीज यांना चांगलाच धडा शिकवला होता. अंदमानच्या कारागृहात असतांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी धर्मांतराच्या विरोधात युद्ध छेडले. हिंदूंचे प्रबोधन करून त्यांचा धर्माभिमान वृद्धींगत करण्यासह ‘जशास तसे’ ही नीती आचरली आणि धर्मांतराचे षड्यंत्र हाणून पाडले. स्वामी विवेकानंद यांचे ‘धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर’ हे मर्म स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जाणले होते. त्यामुळेच स्वातंत्र्यासाठी आजीवन प्रयत्नरत असतांना त्यांनी धर्म अबाधित रहाण्यासाठीही कार्य केले. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या नेतृत्वाची देशाला आवश्यकता आहे. त्यात केंद्रातही छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पूज्य मानणार्या पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे हिंदूंचे अस्तित्व टिकवण्यासाठी पर्यायाने देशाच्या सार्वभौमत्वासाठी धर्मांतर रोखणे अपरिहार्य आहे. संपूर्ण देशात धर्मांतरबंदी कायदा करणे, धर्मांतर करणार्यांना कठोर शिक्षा करणे, धर्मांतराच्या विरोधात कार्य करणारे हिंदुत्वनिष्ठ आणि संघटना यांना शासकीय पातळीवर संरक्षण देणे अन् हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यात धर्माभिमान रुजवणे या सूत्रांना धरून कार्य केल्यास धर्मांतर निश्चितच रोखता येईल !