सांगली जिल्ह्यातील कडक दळणवळणबंदी २६ मेअखेर वाढवली ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी
किराणा, भाजीपाला, बेकरी, फळ-विक्रेते यांना घरपोच सेवा देण्यास अनुमती
सांगली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५ ते १५ मे या कालावधीत सांगली जिल्ह्यात कडक दळणवळणबंदी घोषित करण्यात आली होती. १५ मे या दिवशी ती १७ मेअखेर वाढवण्यात आली होती. जिल्ह्यातील परिस्थितीचे अवलोकन केल्यावर ही कडक दळणवळण बंदी २६ मेअखेर वाढवण्यात आली आहे. यात सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत भाजीपाला, बेकरी आणि फळे घरपोच देता येतील. या कालावधीत दुकानांच्या ठिकाणी प्रत्यक्ष वस्तू, सेवा अथवा ‘पार्सल’ देण्यास मनाई करण्यात आली आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेत कृषी उत्पन्न बाजार समितीमधून घाऊक व्यापारी हे किरकोळ व्यापार्यांना माल देऊ शकतील, अशी माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी १७ मे या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, खरीप हंगामासाठी शेतकर्यांना अडचण येऊ नये; म्हणून बियाणे, खते, शेतीविषयक उपकरणे आणि त्यांची दुरुस्ती, देखभाल पुरवणार्या शेतीविषयक सेवा सकाळी ७ ते ११ पर्यंत चालू रहातील.