कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?
कोरोनाबाधित असल्याचे निदान झाल्यावर रुग्ण साधिकेला आरोग्य व्यवस्थेच्या संदर्भात आलेले कटू अनुभव आणि कर्मचारी अन् अधिकारी यांच्या उर्मटपणामुळे भोगावा लागलेला मनःस्ताप !
‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवील !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. कोरोनाबाधित असल्याचे निदान होऊनही कोणतीही माहिती न देता घरी जाण्यास सांगणे
१२ एप्रिल या दिवशी माझा घसा दुखू लागला. दुसर्या दिवशी ताप आल्याने मी माझ्या प्रकृतीविषयी आरोग्य साहाय्यता समितीला कळवले. १४ एप्रिलला मी आणि माझे यजमान आम्ही दोघे दुपारी अँटिजेन चाचणी करण्यासाठी गेलो. तेथे पुष्कळ गर्दी असल्याने आम्हाला दुपारी २.१५ नंतर येण्यास सांगितले. त्या वेळेत तेथे पोचल्यावर ‘आता वेळ संपली आहे. तुम्ही उद्या या’, असे सांगण्यात आले. आम्ही एकूण २० जण होतो. आम्ही सर्वांनी चाचणी करण्याची विनंती केल्यावर तेथील कर्मचार्यांनी पुन्हा चाचणी करण्यास प्रारंभ केला. चाचणीनंतर मी कोरोनाबाधित असल्याचे समजले. तेथे असलेल्या कोरोनाबाधितांना एका खोलीत बसण्यास सांगितले. आधुनिक वैद्य येऊन तुम्हाला पुढील मार्गदर्शन करतील’, असे सांगण्यात आले. आम्ही ७-८ जण होतो. ४० मिनिटांनी एक स्त्री कर्मचारी येऊन आमचे अहवाल घेऊन गेली. तिने आम्हाला कोणतेही मार्गदर्शन केले नाही. त्यानंतर आम्हाला घरी जाण्याविषयी सांगण्यात आले, तसेच ‘आरोग्य खात्यातून तुम्हाला उद्या संपर्क केला जाईल आणि ते तुम्हाला औषधे देतील’, असेही सांगितले.
२. माझ्या घरी मी, माझे यजमान आणि सासूबाई (वय ७८ वर्षे) असे आम्ही रहातो. मी कोरोनाबाधित असल्याने त्या दोघांना त्रास होईल’, असे मी कर्मचार्यांना सांगितले. त्यावर ते म्हणाले, ‘‘त्या दोघांनाही उद्या चाचणी करण्यासाठी पाठवा.’’ प्रत्यक्षात मला विलगीकरण कक्षात पाठवणार कि नाही, याविषयी त्यांनी काहीच कल्पना दिली नाही.
३. आरोग्य विभागातील अधिकार्यांनी आपापल्या जबाबदारीवर गृह विलगीकरणात रहाण्यास सांगणे आणि त्यांची बोलण्याची पद्धतही अयोग्य असणे
दुसर्या दिवशी दुपारी १२ ते १२.३० या वेळेत आरोग्य विभागातील अधिकार्यांनी २ वेळा माझ्या प्रकृतीविषयी विचारले. माझा अर्ज संगणकात भरतांना एका कर्मचार्याने त्यात चुकीची माहिती भरली होती, असेही त्यांनी सांगितले. औषधे आरोग्य विभागाकडून मिळणार असल्याचे मला सांगण्यात आले होते. त्याविषयी मी विचारल्यावर तेथील अधिकार्यांनी मला सांगितले, ‘‘तुम्हाला तुमच्या आधुनिक वैद्यांनी औषधे दिली असतील, तर आम्ही वेगळी औषधे देणार नाही. तुम्ही तुमच्या जबाबदारीवर गृह विलगीकरणात रहाणार’, असे आम्हाला लिहून द्या.’’ आमचे घर लहान असल्याने तसे करणे शक्य नसल्याचे मी त्यांना कळवले. त्यावर ते म्हणाले, ‘‘तुम्ही तसे लिहून द्या. आम्ही पहातो.’’ तेथील अधिकारी मला बोलूच देत नव्हते. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचीच फक्त उत्तरे द्या’, हीच त्यांची भाषा होती. तेथून मला विचारले जायचे की, तुम्हाला आमच्या आधुनिक वैद्यांशी बोलायचे आहे का ? मी ‘हो’ असे सांगायचे; पण प्रत्यक्षात मला त्यांनी त्यांच्या आधुनिक वैद्यांशी कधीच संपर्क साधून दिला नाही.
४. सासूबाई कोरोनाबाधित झाल्यानंतरही त्यांना ८ दिवस बेड न मिळाल्याने घरात अन्य कुटुंबियांसह २ कोरोनाबाधित रुग्णांना एकत्र रहावे लागणे
माझ्या सासूबाईंचाही कोरोनाचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला. त्यांना बेड मिळण्यासाठी मी विनंती अर्जही भरला; पण ८ दिवस होऊनही त्यांना बेड मिळाला नाही. मी बेड मिळण्यासाठी आरोग्य सेवाकेंद्रात संपर्क करायचे; पण तेथील व्यक्ती मला पूर्णपणे माहिती न देता म्हणायच्या, ‘‘तुम्ही किती बोलता ? आमच्याकडे काय तुम्ही एकच रुग्ण आहात का ? आम्हाला दिवसभर भरपूर संपर्कांना उत्तरे द्यावी लागतात.’’ असे म्हणून दूरभाष ठेवून दिला. नंतर त्यांचा एकदाही दूरभाष आला नाही. घर लहान असूनही एकाच घरात आम्हा २ कोरोनाबाधित रुग्णांना रहावे लागले.
एखादी व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आढळल्यास गृह विलगीकरणाचा शिक्का मारून तिला घरी पाठवतात, यामागची कारणे आणि मानसिकता समजत नाही. कोरोनाबाधित रुग्णाला घरी पाठवल्यावर घरातील अन्य सदस्यांचा विचार केला जात नाही. त्यापेक्षा विलगीकरण कक्ष वाढवणे हेच पालिकेचे प्रथम कर्तव्य आहे, असे वाटते.
– सौ. हर्षा देवघरे, कळवा, ठाणे.
‘या लेखात छापण्यात आलेले अनुभव वैयक्तिक आहेत. असे अनुभव प्रत्येकाचे असतीलच, असे नाही. तसेच यामध्ये अफवा पसरवण्याचा हेतू नाही. जनतेसमोर हे अनुभव ठेवण्यामागे ते प्रशासनापर्यंत पोचून त्यावर कार्यवाही व्हावी, हा उद्देश आहे. या लिखाणाद्वारे कुणाची मानहानी करण्याचा उद्देश नाही, तर आरोग्य व्यवस्थेत सुधारणा व्हावी अन् जनतेला दिलासा मिळावा, हा उद्देश आहे.’ – संपादक
कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव त्वरित कळवा !आपणासही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा. समाजाच्या प्रबोधनासाठी असे अनुभव त्वरित लिखित स्वरूपात कळवणे, ही काळानुसार समष्टी साधना आहे, हे लक्षात घेऊन येणारे कटू किंवा चांगले अनुभव त्वरित पाठवावेत. आरोग्य साहाय्य समिती पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१. संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१० ई-मेल पत्ता : arogya.sahayya@hindujagruti.org |