आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व आणि द्रष्टेपण !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या अवतारी गुरूंची आणि त्यांच्या अवतारी कार्याची महती माझ्यासारख्या जिवाला काय ज्ञात होणार ? तरीही गेली २३ वर्षे मला स्थुलातून त्यांच्या जवळ रहाण्याचे भाग्य त्यांच्याच कृपेने लाभले आणि त्यांच्या माध्यमातून स्थापन होणार्या सनातन धर्मराज्याची (हिंदु राष्ट्राची) जडण-घडण होतांना मला ‘याची देही याची डोळा’ प्रत्यक्ष पहाता आली. जे माझ्या लक्षात आले, ते मी त्यांच्याच कृपेने लिहीत आहे. १७ मे २०२१ या दिवसापासून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्थुलातील कार्य’ हा भाग पहात आहोत. आज त्या पुढील भाग पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा ! : https://sanatanprabhat.org/marathi/477785.html
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्थूलरूपातील कार्य
३२. संकटांचाही साधकांना लाभ करवून देणे
सनातनच्या विरोधकांनी अनेक वेळा सनातनवर खोटे-नाटे आरोप करून आणि प्रसारमाध्यमांना हाताशी धरून सनातनला विविध प्रकारे त्रास दिला आहे. यातील एक भाग म्हणजे सनातनवर बंदीची टांगती तलवार ठेवणे. बंदीचे संकट घोंघावत असतांनाही साधकांना त्यांच्या साधनेत पुढे जाण्याच्या दृष्टीने लाभ झाला.
३२ अ. सनातनवरील बंदीच्या संभाव्य संकटाचा साधकांना झालेला लाभ : सनातनवरील संभाव्य बंदीच्या संकटाच्या वेळी सनातनने बंदीचे संकट लपवून न ठेवता उघडपणे स्वतःच त्याविषयी सांगणे; बंदी, तसेच तिच्याशी निगडित कारावास, जामीन इत्यादी गोष्टींविषयी साधकांच्या मनाची सिद्धता करवून घेणे; बंदी आली, तरीही ‘साधना कशी चालू ठेवता येईल ?’ या दृष्टीने साधकांना स्वयंपूर्ण बनवणे, यांपासून ते हिंदुत्वनिष्ठ संघटनांना संघटित करणे, पीडित हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या पाठीशी उघडपणे उभे रहाण्याची त्यांची सिद्धता करवून घेणे इत्यादी अनेक सूत्रे लक्षात आली. यावरून असे म्हणता येईल की, ‘बंदीच्या या वरचेवर आलेल्या संकटामुळे अन्य कशाने नाही, एवढा हिंदुत्वाचा लाभ झाला’; अर्थात् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक अधिष्ठानामुळे झाले.
३३. उत्तरोत्तर अधिकाधिक संख्येने तरुण पिढी सनातनकडे वळणे
‘अध्यात्म म्हणजे निवृत्त व्यक्तींसाठी फावल्या वेळात करायची गोष्ट’ किंवा ‘अध्यात्म म्हणजे स्वतःपुरता परमार्थ साधणे’, असे अध्यात्माविषयी समाजात अनेकांचे अपसमज आहेत; मात्र ‘आध्यात्मिक साधना ही पूर्णवेळ करायची गोष्ट असून ती बालपणातच चालू केली तर उत्तम !’, हा दृष्टीकोन परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिला. आज समाजातील तरुण पिढी अधिकाधिक संख्येने सनातनकडे श्रद्धेने वळत आहे. सनातनच्या आश्रमांतूनही पूर्णवेळ साधना करणार्यांपैकी बहुसंख्य साधक-साधिका युवा आहेत. आता तर बालवयातील साधकही पूर्णवेळ साधना करत आहेत.
३३ अ. तरुण पिढी सनातनकडे वळण्यामागची कारणे
१. आधुनिक शास्त्रीय परिभाषेत अध्यात्मशास्त्र मांडणे
२. संकेतस्थळांवरून अनेक देशी-विदेशी भाषांमध्ये हे शास्त्र आणि साधना प्रभावीपणे मांडणे
३. सनातनचा सातत्याने समाजात जनसंपर्क असणे
४. सनातन संस्थेचे समाजोपयोगी कार्य समाजात सातत्याने दिसणे
५. भारतभरातीलच नव्हे, तर विदेशातील आणि अन्य पंथांतीलही अनेक साधकांची झालेली आध्यात्मिक उन्नती
६. देश-विदेशातील साधकांनी साधना म्हणून राष्ट्रासाठी योगदान देणे
७. देश-विदेशातील साधकांनी राष्ट्र आणि धर्म यासंदर्भातील अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवणे इत्यादी.
३४. सनातनच्या सर्व कार्यक्रमांना केवळ संतांनाच बोलावणे आणि राजकारण्यांना दूर ठेवणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आरंभीपासून आतापर्यंत सनातनच्या सर्व कार्यक्रमांना केवळ संतांनाच बोलावले आहे. त्यांनी कोणत्याही कार्यक्रमात राजकारण्यांना कधीही सहभागी करून घेतलेले नाही. याला क्वचित अपवाद म्हणजे स्वतः साधक असलेले किंवा साधकत्व असलेले राजकारणी. संस्था ईश्वर चालवतो, असा परात्पर गु्र्ु डॉ. आठवले यांचा ईश्वराप्रती भाव आहे.
(क्रमश: वाचा उद्याच्या अंकात)
– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.४.२०१७)
दैवी बालके
पुढे हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यावर ते चालवण्यासाठी महर्लोकातून अनेक जीव ईश्वरेच्छेने पृथ्वीतलावर भारतात आणि भारताबाहेरही जन्म घेत आहेत. याविषयी सूक्ष्मातून कळणे, या दैवी बालकांना ओळखणे, मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मुलाखतींच्या माध्यमातून त्यांच्या दैवी गुणांविषयी समाजाला माहिती करून देणे, या दैवी बालकांचा योग्य आध्यात्मिक विकास व्हावा यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, तसेच आश्रमात राहून साधना करण्याची सुविधा प्राप्त करून देणे इत्यादी अनेक गोष्टी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केल्या आहेत.
अन्य संघटनांच्या संदर्भात केलेले कार्य
१. समाजाला संघटित करणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सातत्याने समाजाला संघटित करण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. कधी नव्हे एवढी हिंदूंनी संघटित होण्याची आवश्यकता असतांना हिंदू जाती, संप्रदाय इत्यादी अनेक-अनेकांत विभाजित आहेत आणि म्हणूनच देशात बहुसंख्य असूनही त्यांनाच दुय्यम नागरिकाचे स्थान आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतः अनेक ठिकाणी जाऊन तेथील संतांच्या वैयक्तिक भेटी घेऊन स्थानिक संतांना एकत्रित आणले. त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी ‘सर्वसंप्रदाय सत्संग’ घेऊन विविध संप्रदायांना एका व्यासपिठावर आणले. त्याही पुढे जाऊन त्यांनी सर्वधर्म सत्संगाच्या माध्यमातून विविध पंथांना एकत्रित आणण्याचे कार्य केले.
२. आधी संत आणि आता महर्षि जोडले जाणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांची महती अशी की, त्यांनी केवळ आज समाजात असणार्या संतांनाच या कार्यात जोडले असे नाही, तर अनेक संतांच्या माध्यमातून त्यांचे हिमालयवासी मार्गदर्शक किंवा त्यांचे गुरु हेही या कार्यात जोडले गेले. आता तर जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षि, महर्षि भृगु हेही जोडले गेले आहेत.
आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |