आधुनिक वैद्यांअभावी अकोला सुपर स्पेशालिटी रुग्णालय बंद; चालू करण्यासाठी प्रयत्न चालू ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
अकोला – ‘भाजप सत्तेत असतांना शहरात ‘सुपर स्पेशालिटी रुग्णालय’ बांधण्यात आले होते. त्यासाठी आवश्यक त्या यंत्रणा सध्या आलेल्या आहेत; मात्र हे राज्य सरकार त्या रुग्णालयाला आधुनिक वैद्य आणि इतर मनुष्यबळ पुरवू शकले नाही. त्यामुळे अशा महामारीच्या काळातही हे २०० बेडचे रुग्णालय बंद आहे. या रुग्णालयात मनुष्यबळ आल्यास येथे रुग्णांना सेवा देता येणार आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १७ मे या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.
जिल्ह्यातील कोरोनाच्या संदर्भातील आढावा घेण्यासाठी फडणवीस यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी ‘सुपर स्पेशालिटी रुग्णालया’ला भेट देऊन पहाणी केली.
ते पुढे म्हणाले, ‘जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. रुग्णसंख्येपेक्षा मृत्यूचे प्रमाण वाढणे चिंतनीय आहे. या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकार्यांची बैठक घेण्यात आली. त्यांच्याकडून उपचाराच्या संदर्भात येणार्या अडचणींविषयी माहिती घेऊन योग्य ती व्यवस्था पुरवण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी करणार आहोत. लवकरच ‘ऑक्सिजन प्लान्ट’ चालू करणार आहोत. या रुग्णालयामध्ये नव्याने ६० बेडचे कोरोना प्रभाग सिद्ध करण्यात आले आहेत; मात्र येथेही मनुष्यबळ नसल्यामुळे हा प्रभाग अद्यापही कार्यान्वित झाला नाही.