चक्रीवादळामुळे गोव्यात कोरोना लसीकरण आणि वीजपुरवठा यांवर परिणाम !
१. आपत्कालीन स्थितीमुळे अग्नीशमन दलाला १५ मे या दिवशी सायंकाळपासून राज्यभरातील विविध ठिकाणांहून शेकडो लोकांनी संपर्क केला. अग्नीशमन दलाचे जवान पडलेली झाडे बाजूला करणे, रस्त्यावरील अडथळे दूर करणे या कामांत १५ मेपासून व्यस्त आहेत, तसेच वीज खात्याचे कर्मचारी तुटलेल्या वीजवाहिन्यांचे दुरुस्तीकाम करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात व्यस्त आहेत.
२. सोसाट्याच्या वार्यामुळे शेकडो एकर भूमीतील कृषी उत्पादने नष्ट झाली आहेत.
३. वीजपुरवठा खंडित झाल्याने राज्यातील गृहअलगीकरणात असलेल्या सहस्रो कोरोनाबाधित रुग्णांना समस्यांना सामोरे जावे लागले.
४. वीजपुरवठा खंडित झाल्याने, इंटरनेट जोडणीअभावी आणि रस्ते बंद झाल्याने राज्यातील अनेक ठिकाणची कोरोना लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली. आरोग्य खात्याचे अधिकारी डॉ. बोरकर म्हणाले, ‘‘१६ मे या दिवशी दक्षिण गोव्यात बाळ्ळी केंद्राव्यतिरिक्त इतर सर्व केंद्रांमध्ये कोरोना लसीकरण चालू होते, तर उत्तर गोव्यात मये, कांदोळी, पर्वरी, खोर्ली, शिवोली आणि कासारवर्णे येथील कोराना लसीकरण केंद्रे बंद होती. ज्यांचे १६ मे या दिवशी लसीकरण झाले नाही, त्यांचे १७ मे या दिवशी त्याच केंद्रात लसीकरण होईल.
५. सोसाट्याच्या वार्यामुळे खनिज वाहून नेणारे एक जहाज झुआरी नदीत वाहून गेले आणि शिरदोन येथे अडकून पडले.
६. कोविड स्टेपअप रुग्णालय आणि कोरोना निगा केंद्र यांमध्ये रूपांतर केलेल्या बांबोळी येथील शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमच्या दर्शनी भागातील काचेच्या सुशोभिकरणाचा काही भाग उडून गेला.