वैशाख मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !
साप्ताहिक शास्त्रार्थ
‘१२.५.२०२१ या दिवसापासून वैशाख मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, श्री शालिवाहन संवत् (शक) १९४३, उत्तरायण, वसंतऋतू, वैशाख मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे.
(संदर्भ : दाते पंचांग)
२. शास्त्रार्थ
२ अ. भद्रा (‘विष्टी’ करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते. त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यात विलंब होण्याचा संभव असतो. १६.५.२०२१ या दिवशी सकाळी १०.०२ पर्यंत, १९.५.२०२१ या दिवशी दुपारी १२.५१ पासून रात्री १२.४३ पर्यंत, तसेच २२.५.२०२१ या दिवशी रात्री ८.०४ पासून २३.५.२०२१ या दिवशी सकाळी ६.४३ पर्यंत विष्टी करण आहे.
२ आ. श्री आद्यशंकराचार्य जयंती : सोमवार, १७.५.२०२१ या दिवशी श्री आद्यशंकराचार्य जयंती आहे. सूर्योदय व्यापिनी वैशाख शुक्ल पंचमीला श्री आद्यशंकराचार्य जयंती साजरी करतात. श्री आद्यशंकराचार्य यांनी अद्वैतवाद प्रस्थापित केला. ज्ञानमार्गाचा पुरस्कार केला. संपूर्ण भारतभर भ्रमण करून त्यांनी वैदिक धर्माची पुनःस्थापना केली. त्यांची बुद्धीमत्ता प्रगल्भ होती. ते महान पंडित आणि लेखक होते. ‘शांकरभाष्य’ हे त्यांचे लिखाण प्रसिद्ध आहे. वयाच्या ३२ व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली.
२ इ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. १७.५.२०२१ या दिवशी दुपारी १.२२ पासून १८.५.२०२१ या दिवशी दुपारी १२.३३ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
२ ई. गंगोत्पत्ति-गंगापूजन : मध्याह्य व्यापिनी वैशाख शुक्ल सप्तमीला ‘गंगोत्पत्ति-गंगापूजन’ करतात. या तिथीला ‘गंगा सप्तमी’ असेही म्हणतात. १८.५.२०२१ या दिवशी ‘गंगापूजन दिन’ आहे.
२ उ. श्रीनृसिंह नवरात्रारंभ : १८.५.२०२१ या दिवशी श्रीनृसिंह नवरात्रारंभ चालू होणार आहे. वैशाख शुक्ल चतुर्दशी या तिथीला श्रीनृसिंह जयंती साजरी करतात. त्यापूर्वी श्रीनृसिंह नवरात्रारंभ चालू होते.
२ ऊ. बुधाष्टमी : बुधवारी येणार्या अष्टमीला ‘बुधाष्टमी’ म्हणतात.
२ ए. दुर्गाष्टमी : प्रत्येक मासाच्या अमावास्येनंतर येणार्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला ‘दुर्गाष्टमी’ म्हणतात. २०.५.२०२१ या दिवशी दुपारी १२.२३ पर्यंत दुर्गाष्टमी आहे. या दिवशी श्री दुर्गादेवीचे व्रत करतात. दुर्गासप्तशतीस्तोत्र, देवीकवच, अर्गलास्तोत्र आदी देवीस्तोत्रांचे वाचन करतात.
२ ऐ. मिथुनायन : २०.५.२०२१ या दिवशी उत्तररात्री १.०६ नंतर रवि ग्रह सायन पद्धतीनुसार (पाश्चात्त्य पद्धतीनुसार) मिथुन राशीत प्रवेश करत आहे.
२ ओ. मोहिनी (स्मार्त) एकादशी : वैशाख शुक्ल पक्ष एकादशीला ‘मोहिनी एकादशी’ म्हणतात. २२.५.२०२१ या दिवशी मोहिनी (स्मार्त) एकादशी आहे. या एकादशीच्या व्रताने व्यक्तीला मोह आणि पाप यांपासून मुक्ती मिळते. या दिवशी भगवान श्रीविष्णूचे पूजन करतात. एखाद्या मासात ‘स्मार्त’ आणि ‘भागवत’ अशी दोन दिवस एकादशी तिथी असते, तेव्हा स्मार्त म्हणजे स्मृति आणि शास्त्रेे मानणारे हिंदु ‘स्मार्त एकादशी’ करतात, तर भागवतधर्म पाळणारे वारकरी ‘भागवत एकादशी’ करतात.
टीप १ : भद्रा (विष्टी करण), घबाड मुहूर्त, दुर्गाष्टमी, एकादशी आणि यमघंट यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे.
टीप २ : वरील सारणीतील शुभ / अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांची पुढील वचने लक्षात ठेवावीत. हरिचिया दासा हरि दाही दिशा अर्थ : भक्ताला सर्वत्र देवाचेच दर्शन होते. भक्ताचा जसा भाव असतो, त्या स्वरूपात त्याला देव दिसतो. हे सूत्र साधक आणि भक्त यांनी लक्षात घ्यावे. – सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (८.५.२०२१) |