हिंगोली येथे मराठा आरक्षण प्रश्‍नावरून ‘मराठा शिवसैनिक सेने’चे जोडेमारा आंदोलन !

हिंगोली – मराठा आरक्षण प्रश्‍नाविषयी सर्वोच्च न्यायालयात योग्य भूमिका न मांडल्याच्या कारणावरून मराठा शिवसैनिक सेनेच्या वतीने १५ मे या दिवशी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मराठा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या प्रतिमांना जोडेमारा आंदोलन करण्यात आले. आंदोलन अचानक झाल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना कह्यात घेतले. या वेळी कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. ‘मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन चालूच रहाणार आहे. यापुढे आणखी आक्रमक आंदोलन केले जाईल’, अशी चेतावणी मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक विनायक भिसे पाटील यांनी दिली.