चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण गोव्यात सर्वाधिक
सलग ३ आठवडे गोवा प्रथम क्रमांकावर
पणजी, १५ मे (वार्ता.) – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार चालू आठवड्यात गोवा राज्य पुडूचेरीसमवेत चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात देशात प्रथम स्थानावर आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण गोव्यात सलग गेले ३ आठवडे देशात सर्वाधिक आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असलेले देशात एकूण १५ जिल्हे आहेत आणि यामध्ये उत्तर गोवा जिल्ह्याचा समावेश आहे.
गोवा राज्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण ८ ते १४ मे या कालावधीत सरासरी ४२ टक्के आहे, तर पुडूचेरीचे प्रमाण सरासरी ४२.३ टक्के आहे. बंगालचे प्रमाण ३३.४ टक्के असून तो चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात देशात तिसर्या स्थानावर आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील २४ राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण १५ टक्क्यांहून अधिक आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेने राज्यात मे मासाच्या पहिल्या पंधरवड्यात कोरोनाबाधित ८८८ रुग्णांचा बळी घेतला. यामध्ये ११ मे या दिवशी सर्वाधिक म्हणजे कोरोनाबाधित ७५ रुग्णांचा मृत्यू झाला. या पहिल्या पंधरवड्यात एकूण ४३ सहस्र ४९० कोरोनाबाधित रुग्ण आढळले
गोव्यातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत १ सहस्र ६१३ ने घट दिवसभरात ५८ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर १ सहस्र ९५७ नवीन रुग्ण
पणजी – गोव्यात १५ मे या दिवशी ५८ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे कोरोनामृतांची संख्या २ सहस्र ५६ झाली आहे. दिवसभरात कोरोनाशी संबंधित ५ सहस्र ५७१ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १ सहस्र ९५७ नवीन रुग्ण आढळले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण घटून ३५.१२ टक्के झाले आहे. दिवसभरात ३ सहस्र ५१२ रुग्ण कोरोनापासून बरे झाले, तर कोरोनाबाधित २०९ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. यामुळे राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या घटून ३० सहस्र ७७४ झाली आहे.