गोमेकॉत २० सहस्र लिटर क्षमतेची लिक्विड ऑक्सिजनची टाकी युद्धपातळीवर बसवून केली कार्यान्वित ! – आरोग्य खात्याचे सचिव
गोमेकॉतील कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर उणावण्यासाठी शासनाचे शर्थीचे प्रयत्न
पणजी, १५ मे (वार्ता.) – गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (गोमेकॉ) कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर उणावण्यासाठी गोवा शासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. गोमेकॉत २० सहस्र लिटर क्षमतेची लिक्विड ऑक्सिजनची टाकी युद्धपातळीवर बसवून ती कार्यान्वित करण्यात आली आहे. गोमेकॉला आता या नवीन टाकीतूनच लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे. व्हिनस इहॉक्सीइथर्स प्रा.लि. या आस्थापनाने ही क्रायोजेनिक ऑक्सिजन टाकी दान स्वरूपात देतांना ती आहे तेथून काढून गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उभारणे, प्लंबिंगचे काम करणे आणि टाकी कार्यान्वित करणे आदी सेवा युद्धपातळीवर विनामूल्य केली आहे. याविषयी ‘गार्ड’ या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने इहॉक्सीइथर्स प्रा.लि.चे आभार मानले आहेत.
गोमेकॉत ऑक्सिजनचा पुरवठा करणारी जुनी ट्रॉलीव्यवस्था आता अतिरिक्त सुविधा (बॅक अप) म्हणून वापरली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य खात्याच्या सचिवांनी दिली आहे. गोमेकॉतील कोरोनाबाधित ३५० रुग्णांना १५ मे या दिवशी गोमेकॉच्या नव्याने बांधण्यात आलेल्या सूपर स्पेशालिटी विभागात स्थलांतर करण्यात आले आहे. या सूपरस्पेशलिटी विभागात ऑक्सिजनचा पुरवठा २० सहस्र लिटर ऑक्सिजनच्या टाकीतून होणार आहे.
कोरोनाबाधित ३५० रुग्णांना सूपर स्पेशालिटी विभागात हालवले ! – विश्वजीत राणे, आरोग्यमंत्री
याविषयी माहिती देतांना आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले, ‘‘जी.व्ही.के. ई.एम्.आर्.आय. १०८’ यांच्या साहाय्याने कोरोनाबाधित सुमारे ३५० रुग्णांना सूपर स्पेशालिटी विभागात स्थलांतर करण्यात आले आहे. सूपर स्पेशालिटी विभागातील तज्ञ डॉक्टरांचा गट या रुग्णांवर देखरेख ठेवून आहे.’’ गोमेकॉमध्ये प्रतिदिन कोरोनाबाधित शेकडो रुग्णांना उपचारासाठी भरती केले जात आहे. सूपर स्पेशालिटी विभागात ५५० खाटांची क्षमता आहे.
१७ मेपासून खासगी रुग्णालयांतील कोरोनाबाधित रुग्णांसाठीच्या खाटा गोवा शासनाच्या नियंत्रणात ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
सोमवार, १७ मेपासून राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांतील कोरोनाबाधित रुग्णांसाठी आरक्षित असलेल्या खाटा गोवा शासन नियंत्रणात घेणार आहे. या अंतर्गत रुग्णांना प्रवेश देण्याची प्रक्रिया शासन सांभाळणार आहे. खासगी रुग्णालयांमध्ये ‘डी.डी.एस्.एस्.वाय्.’ या विमा योजनेच्या अंतर्गत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. खासगी रुग्णालयाची निम्मी क्षमता कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १५ मे या दिवशी सायंकाळी उशिरा घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचीही उपस्थिती होती.