चक्रीवादळामुळे सोसाट्याचा वारा, समुद्र खवळला आणि मुसळधार पावसाच्या सरी

‘तौक्ते’ चक्रीवादळ गोव्याच्या समुद्रकिनारपट्टीनजीक

पणजी, १५ मे (वार्ता.) – ‘तौक्ते’ चक्रीवादळ गोवा राज्याच्या समुद्रकिनारपट्टीपासून ३३० कि.मी. अंतरावरून पुढे सरकत आहे. यामुळे राज्यात सोसाट्याचे वारे वहात असून अरबी समुद्र खवळलेला आहे. काही भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. तौक्ते चक्रीवादळाचा गोव्याला तडाखा बसू लागल्याने १५ मे या दिवशी गोव्यातील समुद्रकिनारपट्टीतील काही भागांत पाण्याची पातळी वाढलेली दिसून आली, तसेच या भागांतील काही घरांमध्येही पाणी शिरल्याचे वृत्त आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे गोव्यात १५ आणि १६ मे हे २ दिवस सोसाट्याचे वारे वहाण्यासमवेतच काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान खात्याने म्हटले आहे की, १५ मे या दिवशी गोव्यासह दक्षिण महाराष्ट्र भागांत (रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे) ताशी सुमारे ७० कि.मी. वेगाने वारे वाहू शकतात, तर १८ मे या दिवशी वार्‍याचा हा वेग वाढून तो अधिकाधिक ताशी सुमारे ८० कि.मी. होऊ शकतो. गोव्यातील दोन्ही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.  आगामी ३ दिवस समुद्र खवळलेला असल्याने मासेमारांसाठी धोक्याची चेतावणी देण्यात आली आहे.

गोव्यात बचाव कार्यासाठी ‘एन्.डी.आर्.एफ्.’चा एक गट नियुक्त

चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे येथून ‘नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स’चा (‘एन्.डी.आर्.एफ्.’चा) गट गोव्यात आला आहे. ‘एन्.डी.आर्.एफ्.’चे कमांडंट अनुपम श्रीवास्तव म्हणाले, ‘‘ एन्.डी.आर्.एफ्.’चा एक गट गोवा येथे, ३ गट मुंबई येथे, तर १४ गट पुणे येथे मुख्यालयात नेमण्यात आले आहेत.’’