रुग्णालयांमधील दुर्घटना आणि मानवी जिवांचे मूल्य !
गेल्या ४ मासांत महाराष्ट्रातील रुग्णालयांमध्ये ४ दुर्घटना घडल्या. यात अनुमाने ६० रुग्णांचा मृत्यू झाला. ३ घटना आगीमुळे घडल्या, तर एक घटना ऑक्सिजनच्या गळतीमुळे घडली. चारही घटना अत्यंत दुर्दैवी होत्या. कुठेही आग किंवा अपघात झाल्यावर जो गदारोळ होतो, तो येथेही झाला. सत्ताधार्यांनी आर्थिक साहाय्य घोषित केले, चौकशी समित्या नेमल्या आणि या घटनांचे खापर कुणावर तरी फोडून मोकळे झाले.
१. भंडारा येथे सरकारी रुग्णालयाला आग लागून १० बालकांचा मृत्यू !
९ जानेवारी २०२१ या दिवशी पहाटेे २ वाजता भंडारा येथील सरकारी रुग्णालयातील नवजात बालकांच्या दक्षता कक्षाला आग लागली. या आगीत १० बालके होरपळून मृत्यूमुखी पडली आणि ७ बालके वाचली. जी बालके नुकतीच जन्माला आली होती, त्यांचा हे जग बघायच्या आधीच करूण अंत झाला. एका मानवी चुकीमुळे काळाने त्यांना हिरावून नेले. या प्रकरणी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी काही लाखांचे साहाय्य घोषित केले अन् थातूरमातूर चौकशी केली. चौकशीअंती एका हंगामी परिचारिकेच्या माथी हा दोष मारून तिला सेवेतून मुक्त करण्यात आले. या चौकशीत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात आले आणि काही उत्तरदायी व्यक्ती अलगद सुटल्या.
२. भांडुप येथे सनराईज रुग्णालयाला लागलेल्या आगीत ११ कोविड रुग्णांचा मृत्यू !
२६ मार्च २०२१ या दिवशी मध्यरात्री भांडुप येथे ड्रिम्स मॉल या इमारतीत असलेल्या सनराईज रुग्णालयाला आग लागली. ही आग इमारतीच्या पहिल्या मजल्याला लागली आणि पुढे ती तिसर्या मजल्यावरील रुग्णालयापर्यंत पोचली. १०७ खाटांची व्यवस्था असलेल्या या रुग्णालयाला जानेवारी २०२१ मध्ये कोविड सेंटर म्हणून मान्यता मिळाली होती. दुर्घटनेच्या वेळी ७८ रुग्ण येथे उपचार घेत होते. त्यांच्यातील ११ रुग्णांचा जागीच गुदमरून मृत्यू झाला आणि उर्वरित ६७ रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हालवण्यात आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनुमाने १ सहस्रांहून अधिक दुकाने असलेल्या या मॉलमध्ये हे रुग्णालय कसे चालू झाले आणि याला कोविड सेंटर म्हणून मान्यता कशी मिळाली, हे एक कोडेच आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरांनी या रुग्णालयाला भेट दिली, तेव्हा रुग्णालयाला मिळालेल्या मान्यतेविषयी आश्चर्य व्यक्त केले. मृत रुग्णांपैकी ६ रुग्ण अतीदक्षता विभागात उपचार घेत होते. आग वाढत गेली, तेव्हा अनेक रुग्ण, आधुनिक वैद्य आणि कर्मचारी छतावर गेले अन् तेथून मॉलमध्ये उतरून खाली आले. येथेही साहाय्याचे सर्व सोपस्कार पार पडले. या दुर्घटनेसाठी व्यापारी संकुलाचे मालक वाधवान पिता-पुत्र आणि ३ आधुनिक वैद्य अशा ६ जणांंना उत्तरदायी ठरवण्यात आले अन् त्यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३०४ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला.
३. नाशिक येथे महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे २२ कोविड रुग्णांचा मृत्यू !
नाशिक येथे महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची गळती झाली. यात कोरोनावर उपचार करणार्या २२ हून अधिक कोविड रुग्णांचा मृत्यू झाला. ही घटना पहाटेच्या वेळी घडली. ऑक्सिजनच्या टाकीमध्ये ऑक्सिजन भरतांना टाकीतून वायूगळती झाली. त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन मिळणे बंद झाले. त्यानंतर रुग्णांच्या नातेवाइकांनी छातीवर दाब देऊन आणि पंपिंग करून रुग्णांचे जीव वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले; परंतु त्यात त्यांना यश आले नाही. रुग्णालयात १५७ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. त्यांपैकी ६३ रुग्ण अतीदक्षता विभागात होते. त्यातील ११ रुग्ण व्हेंटिलेटरवर, तर ११ जण ऑक्सिजनवर होते. या ऑक्सिजन गळतीमुळे ऑक्सिजनचा पुरवठा अनुमाने २ घंटे बंद ठेवण्यात आला. असे म्हणतात की, ऑक्सिजनच्या टाकीला बारीक छिद्र पडले होते आणि नंतर ते मोठे होत गेले. या घटनेनंतर पंतप्रधान, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यासह अनेक मंत्र्यांनी शोक व्यक्त केला आणि काही लाखांचे साहाय्य देऊ केले.
कोविड सेंटरमध्ये अनेक दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांना वाचवण्याचे प्रयत्न करणार्या कर्मचार्यांना या घटनेचा प्रचंड धक्का बसला आणि ते हमसून हमसून रडू लागले. यावरून या घटनेला रुग्णालयातील कर्मचारी दोषी नसल्याचे दिसून येते. रुग्णालयात असलेल्या ऑक्सिजनच्या टाकीची देखभाल एका खासगी आस्थापनाकडे आहे. या घटनेला संबंधित आस्थापन उत्तरदायी असू शकते.
४. ऑक्सिजनअभावी राज्यात आणि देशात अनेक कोरोना रुग्णांचा मृत्यू !
याच काळात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अंबाजोगाई येथील सरकारी रुग्णालयात ६ रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील अनेक शहरेे, गावे आणि रुग्णालय येथे पुरेसा ऑक्सिजन नसल्याने रस्त्यांवरही रुग्णांचे मृत्यू होत आहेत. देशाची राजधानी असलेल्या देहलीतील सर गंगाराम रुग्णालयामध्ये ऑक्सिजन न मिळाल्याने अनुमाने २५ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर हे प्रकरण देहली उच्च न्यायालयाकडे गेले. तेथे केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यात आला की, पुरेसा ऑक्सिजन साठा कधी पाठवणार ? अनेक दवाखान्यांनी ऑक्सिजन मिळण्यासाठी याचिका प्रविष्ट केल्या. ऑक्सिजनचा अपुरा साठा हा विषय अनेक राज्यांच्या उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित होता. ही सर्व प्रकरणे सर्वोच्च न्यायालयामध्ये वर्ग करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. या प्रकरणी सुनावणी होऊन न्यायालयाने काही सूत्रे उपस्थित केली आणि केंद्र सरकारचे म्हणणे मागवले. यावर केंद्र सरकारने उत्तर प्रविष्ट केले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने देहलीला प्रतिदिन ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा झाला पाहिजे. प्रत्येक दिवशी ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन देहलीतील रुग्णांना दिला पाहिजे. पुढील आदेशापर्यंत हा पुरवठा असाच केला जावा, असा आदेश देतांनाच आम्हाला सरकारच्या विरोधात कठोर निर्णय घ्यावे लागतील, अशी परिस्थिती निर्माण करू नका, अशा शब्दांत फटकारले.
५. विरार येथील रुग्णालयात झालेल्या अग्नीतांडवाला रुग्णालयातील निष्काळजीपणा कारणीभूत !
नाशिक येथील दुर्घटनेनंतर केवळ दीड दिवसाच्या अंतराने विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयामध्ये वातानुकूलित यंत्राचा स्फोट होऊन आग लागली. या आगीत १४ रुग्णांचा क्लेशदायक मृत्यू झाला. हे सर्व रुग्ण कोरोनाच्या उपचारासाठी भरती झाले होते. मागील ४ वर्षांपासून हे रुग्णालय रुग्ण सेवेत आहे. पहाटे ३.१५ च्या सुमारास आग लागली, तेव्हा अतीदक्षता विभागात उपचार घेणार्या १४ जणांचा मृत्यू झाला आणि अन्य ३ रुग्णांची प्रकृती चिंताजनक होती. तेथे उपस्थित असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी सांगितले की, स्फोट होण्याच्या १४ घंट्यांपूर्वी यंत्रात बिघाड झाला होता. याविषयी रुग्णांनी तक्रारही केली होती; परंतु रुग्णालयाच्या प्रशासनाने ते गांभीर्याने घेतले नाही. या प्रकरणी रुग्णालयाचे व्यवस्थापक आणि अन्य एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली.
६. महानगरपालिकांनी रुग्णालयांना केवळ नोटिसा पाठवण्याचे सोपस्कार पार पाडण्यापेक्षा प्रत्यक्षात उपाययोजना करण्याकडे लक्ष देणे आवश्यक !
या सर्व घटनांनंतर फायर ऑडिटचा विषय पुढे आला. अनेक महानगरपालिकांनी फायर ऑडिट करून घेण्याविषयी रुग्णालयांना नोटिसा पाठवायला प्रारंभ केला. वास्तविक महानगरपालिकांनी अग्नीशमनाचे सर्व उपाय यापूर्वीच करणे अपेक्षित होते. आग लागल्यास आग शमण्यासाठी फायर इस्टिंग्युशर बसवले आहेत का ?, आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग दिला आहे का ?, आग विझण्यासाठी स्प्रिंकलर बसवले आहेत का ?, आग विझवण्यासाठी मुख्य पाईपला जोडलेला हायड्रन्ट सुस्थितीत आहे का ? आदी बघणे महत्त्वाचे आहे. केवळ फायर ऑडिट झाले का ?, असे विचारून आणि नोटिसा देऊन विषय संपत नाही. पालिकेने रुग्णालयांना प्रत्यक्षात भेट देऊन निश्चिती करून घेणे आवश्यक आहे. एक व्याधीग्रस्त रुग्ण अतीदक्षता विभागात ऑक्सिजनवर किंवा व्हेंटिलेटरवर असतांना दुर्घटना घडते, तेव्हा त्याची अवस्था काय असते, याचा विचार संबंधित यंत्रणेने केला पाहिजे.
७. देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षांचा काळ लोटला असतांना असे किती दिवसचालू द्यायचे ? याचा सरकारने विचार करावा !
आगीच्या दुर्घटना वारंवार घडत असतात. तरीही संबंधित यंत्रणेकडून कायमस्वरूपी उपाययोजना का केल्या जात नाहीत ? दुर्दैवी घटना घडल्यावर गदारोळ, आरोप-प्रत्यारोप करणे, एकमेकांची उणीदुणी काढणे, लाखो रुपयांचे साहाय्य करणे, चौकशी आयोग नेमणे, २-४ लोेकांना निलंबित करणे किंवा फारतर फौजदारी गुन्हे नोंद करणे या गोष्टी कुठेतरी थांबणे आवश्यक आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षांचा काळ लोटला असतांना असे किती दिवस चालू द्यायचे, हे सरकारने ठरवले पाहिजे ?
श्रीकृष्णार्पणमस्तु !
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद आणि अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय. (२६.४.२०२१)