हरिद्वार येथील महाकुंभमेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याद्वारे व्यापक धर्मप्रसार
८ मार्च ते १९ एप्रिल या कालावधीत हरिद्वार महाकुंभमेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याद्वारे व्यापक धर्मप्रसार करण्यात आला. खरे तर महाकुंभमेळ्याचे प्रथम स्नान महाशिवरात्री अर्थात ११ मार्च या दिवशी होते; परंतु उत्तराखंड शासनाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा १ ते २८ एप्रिल याच कालावधीत होईल, असे घोषित केले. पुढे प्रत्यक्षात कोरोनाचे प्रमाण वाढल्यानंतर १७ एप्रिलपासून हरिद्वारमध्ये जनता कर्फ्यू लावण्यात आला; परिणामी १७ एप्रिलपासून एक प्रकारे महाकुंभमेळ्याची समाप्ती झाली. महाकुंभमेळ्याचा कालावधी अत्यल्प असूनही सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने तेथे मोठ्या प्रमाणात धर्मप्रसार कशा प्रकारे करण्यात आला, हे सांगणारा हा लेख…
अध्यात्माचा प्रसार करणारे फिरते ग्रंथप्रदर्शन आणि त्याद्वारे झालेला ज्ञानशक्तीचा प्रसार !
सरकारी कुंभमेळा जरी १ एप्रिलपासून असला, तरी तत्पूर्वी म्हणजे ८ मार्चपासूनच हरिद्वारमधील जिज्ञासूंपर्यंत अध्यात्माचा प्रसार व्हावा, यासाठी नगरातील हरकी पौडी, भीमगौडा, भूपतवाला, हरिपूर, कनखल, मायापूर, मनसादेवी, चंडीदेवी, अरविंद आश्रम इत्यादी प्रमुख ठिकाणी सनातन संस्थेने फिरते ग्रंथप्रदर्शन उभे केले. कुंभमेळ्याच्या कालावधीत एकाच शहरात एकाच दिवशी १० ठिकाणी ग्रंथप्रदर्शनांद्वारे अध्यात्मप्रसार होणे, ही सनातनच्या इतिहासातील एक वैशिष्ट्यपूर्ण घटना होती.
ऋषिकेश येथेही आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाच्या कालावधीत २ दिवस ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनांचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे जिज्ञासूंना जीवन आनंदमय होण्यासाठी साधना सांगण्यात येत होती. सात्त्विक उत्पादनांची माहिती दिली जात होती. नगरातील बैरागी कॅम्पमध्ये लावण्यात आलेले सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रातील प्रदर्शन पहाण्यासाठी निमंत्रण देण्यात येत होते. काही प्रदर्शनांच्या ठिकाणी धर्मशिक्षण देणारे फलकही लावण्यात आले होते.
महिनाभर चालू असलेल्या फिरत्या ग्रंथप्रदर्शनांचा लाभ म्हणजे संपूर्ण हरिद्वार शहरामध्ये सनातन संस्थेच्या ज्ञानशक्तीचा प्रसार झाला. अनेक लोक भेटल्यानंतर सांगायचे, तुमचे ग्रंथ आम्ही शहरातील अमुक अमुक ठिकाणी पाहिले. या ग्रंथप्रदर्शनाची नोंद शेवटी उत्तराखंड शासन आणि कुंभमेळा प्रशासन यांनाही घ्यावी लागली. सरकारद्वारे अधिकृतपणे प्रसिद्धीसाठी बनवण्यात आलेल्या पत्रकारांच्या कुंभवार्ता या व्हॉट्सअॅप गटामध्ये सरकारद्वारे सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाची छायाचित्रांसह बातमी देण्यात आली. अनेक वृत्तपत्रांनी त्याला प्रसिद्धीही दिली.
फिरत्या ग्रंथप्रदर्शनांचे एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक ठिकाणी पोलिसांनी स्वतःहून साधकांना साहाय्य केले. चमोली (उत्तराखंड) येथील एका धार्मिक यात्रेत ग्रंथप्रदर्शन लावण्यासाठी पोलिसांच्या गटाने संस्थेला आमंत्रित केले. या फिरत्या ग्रंथप्रदर्शनांसाठी देहलीतील दोन मोठ्या आस्थापनांनी एकूण १२ छत्र्या अर्पण केल्या होता. त्यामुळे ग्रंथविक्री करणार्या साधकांचे उन्हापासून रक्षण झाले.
दुकानांमध्ये ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे वितरण
कुंभमेळ्याच्या दोन स्नानांमध्ये एक मासाचे अंतर असल्याने त्या काळात भाविकांची हरिद्वारमध्ये गर्दी अल्प होती. या काळात सनातनच्या साधकांनी नगरातील राणीपूर, हरिपूर, भीमगौडा, हरकी पौडी, कनखल, भूपतवाला इत्यादी ठिकाणच्या दुकानांमध्ये जाऊन अध्यात्माविषयीचे ग्रंथ विशेषतः गंगामहिमा, देवनदी गंगेचे रक्षण करा, कुंभपर्व महिमा आणि शिव अन् सात्त्विक पूजोपयोगी उत्पादने यांचे वितरण केले.
अनेक दुकानदारांना सनातनची सात्त्विक पूजोपयोगी उत्पादने पुष्कळ आवडल्याने त्यांनी ग्राहकांसाठी घाऊक संख्येने घेऊन दुकानात ठेवण्याची इच्छा व्यक्त केली, हे या अभियानाचे वैशिष्ट्य होते. या अभियानाच्या अंतर्गत हरिद्वार येथील व्यापारी श्री. आशिष बंसल यांच्याशी संपर्क आला. त्यांनी स्वतः येऊन सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्र पाहिले. त्यानंतर ते हिंदु राष्ट्र-जागृती केंद्र दाखवण्यासाठी ते नगरातील प्रतिष्ठित मंडळींना घेऊन २ वेळा आले. त्यांनी शहरातील व्यापारी मंडळींसाठी सनातन संस्थेचा धर्मजागृतीविषयीचा कार्यक्रम आयोजित करण्याची इच्छाही व्यक्त केली.
संत आणि आश्रम संपर्क अभियान
हरिद्वारमध्ये आरंभीच्या काळात साधकांची निवास आणि भोजनाची सोय, तसेच राष्ट्र-धर्म जागृतीसाठी जागा मिळणे, यांसाठी हे संपर्क अभियान करण्यात आले. या अभियानाची फलश्रुती म्हणजे एकूण १०० साधकांची शदाणी भक्त निवास, दिव्यधाम, स्वामीनारायण आश्रम, माहेश्वरी भवन, श्री अरविंद आश्रम आणि पालिमरू मठ (बडे हनुमान प्रतिष्ठान) अशा ६ ठिकाणी निःशुल्क निवास व्यवस्था झाली. अडचणीच्या वेळी रामकुंज या आश्रमातही साधकांची सोय करण्यात आली. दिव्य प्रेम सेवा मिशन, काशी अन्नावरम्, भागीरथी आश्रम, माता आनंदमयी आश्रम, शदाणी आश्रम, अरविंद आश्रम, बर्फानी धाम, यांनी साधकांसाठी भोजन उपलब्ध करून दिले. या सर्वांप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्प आहे; कारण भोजन बनवण्याचा वेळ साधकांना धर्मप्रसारासाठी देता आला.
प्रत्यक्ष कुंभमेळ्याच्या कालावधीमध्ये धर्मशिक्षणाचा प्रसार आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटन हे दोन उद्देश ठेवून संत, तसेच आश्रम यांना संपर्क करण्याचे अभियान राबवण्यात आले. या अभियानाच्या अंतर्गत संतांना हिंदु राष्ट्र-स्थापनेविषयी सांगणे, त्यांचे या कार्यासाठी साहाय्य घेणे, त्यांना बैरागी कॅम्पमध्ये लावण्यात आलेल्या सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्राचे आमंत्रण देणे इत्यादी कृती करण्यात आल्या. अनुमाने २०० हून अधिक संत आणि १०० हून अधिक आश्रमांना संपर्क करण्यात आले. या संपर्क अभियानामध्ये हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, समितीचे महाराष्ट्र-छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, मध्यप्रदेश-राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया, हरियाणा-पंजाब समन्वयक श्री. कार्तिक साळुंखे, उत्तराखंड समन्वयक श्री. श्रीराम लुकतुके, प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे आणि युवा संघटक श्री. निरंजन चोडणकर, तसेच सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक हे सहभागी झाले होते.
या संपर्क अभियानाची फलश्रुती म्हणजे १०० हून अधिक संतांनी बैरागी कॅम्पमध्ये लावण्यात आलेल्या सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्राला भेट दिली. हिंदुजागृतीविषयीचे कार्य करणार्या संतांना समितीच्या कुंभ-जनसंवाद या फेसबूक लाईव्ह कार्यक्रमातही सहभागी करून घेण्यात आले.
राष्ट्र-धर्मविषयक प्रवचनांमध्ये सहभाग
कोरोनामुळे कथा-प्रवचनांवर विशेष निर्बंध असले, तरी हिंदु जनजागृती समितीला काही ठिकाणी विषय प्रस्तुत करण्याची संधी मिळाली. शदाणी भक्त निवासमध्ये सिंधी समाजासाठी आयोजित संमेलनामध्ये समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी मार्गदर्शन केले. भागीरथी महाविद्यालयाच्या आमंत्रणानुसार तेथील १ सहस्रांहून अधिक विद्यार्थ्यांशी सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी संवाद साधला. आचार्य विपिन शर्मा यांनी कुंभमध्ये भूमी दिव्य ग्राम शिबिराच्या माध्यमातून प्रतिदिन वेगवेगळ्या विषयांवर जागृती करणार्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. साधक त्यांना भेटायला गेले, त्या वेळी त्यांच्या आयुर्वेद कुंभच्या अंतर्गत कार्यक्रमाला प्रारंभ होणार होता. त्यांनी लगेच श्री. आनंद जाखोटिया यांना व्यासपिठावर घेऊन या विषयावर उद्बोधन करण्यास सांगितले. अनेक ठिकाणी प्रवचनाची निमंत्रणे होती; परंतु कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ही प्रवचने घेणे शक्य होऊ शकले नाही.
सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्र अन् त्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद !
उडुपी, कर्नाटक येथील अष्टमठांपैकी एक असलेल्या सुप्रसिद्ध पालिमरू मठ यांचे बडे हनुमान प्रतिष्ठान हरिद्वारच्या बैरागी कॅम्पमध्ये आहे. बैरागी कॅम्पमध्ये वैष्णव संतांचा कुंभमेळा भरतो. या ठिकाणी पालिमरू मठाने सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्र उभारण्यासाठी भूमी अन् ५० साधकांच्या निवासासाठी ६ कक्ष उपलब्ध करून दिले. त्यामुळे या ठिकाणी समितीच्या वतीने भव्य केंद्र उभारण्यात आले होते. कुंभपरंपरेला अनुसरून केंद्राच्या उभारणीच्या पूर्वी संतांच्या वंदनीय उपस्थितीत विधीवत् भूमीपूजन आणि ध्वजारोहण करण्यात आले. प्रत्यक्ष केंद्र उभारणी झाल्यानंतर त्याची प्रसिद्धी व्हावी, या हेतूने एक उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी स्थानिक संतांच्या उपस्थितीत चैत्र प्रतिपदेला गुढीही उभारण्यात आली.
४ ते १९ एप्रिल या कालावधीत लावण्यात आलेल्या सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्राला ५००० हून अधिक जिज्ञासू आणि १०० हून अधिक संत यांनी भेट दिली.
जिज्ञासूंचे सनातनविषयी जिव्हाळा दर्शवणारे बोलके अभिप्राय !
१. स्वतःच्या घरात कायमस्वरूपी प्रदर्शन लावण्याची इच्छा व्यक्त करणारे श्री. प्रमोद अग्रवाल ! : हरिद्वार ज्येष्ठ नागरिक संघाचे श्री. प्रमोद अग्रवाल यांनी ४ वेळा सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्राला भेट दिली. शेवटच्या दिवशी आम्ही त्यांच्या घरी गेलो, तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र असलेले सनातन संस्थेचे माहितीपत्रक (ब्रोशर) त्यांच्या घरातील पहिल्या खोलीत देवघरात ठेवलेले आम्ही पाहिले. त्यांनी शंकर आश्रम चौक या हरिद्वार येथील मोक्याचे ठिकाण असलेल्या स्वतःच्या निवासस्थानी सनातन संस्थेचे राष्ट्र-धर्म विषयीचे प्रदर्शन कायमस्वरूपी लावण्याची इच्छा व्यक्त केली.
२. साधक भेटल्यामुळे आनंद व्यक्त करणारा एक जिज्ञासू परिवार : पोस्टाद्वारे हिंदी मासिक सनातन प्रभात घेणारे आणि वर्ष २०१४ मध्ये सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन लागलेले असतांना सनातनच्या संपर्कात आलेले जिज्ञासू यांनीही सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्राला भेट दिली. पूर्वी संपर्कात आलेला हरिद्वार येथील एक परिवार सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्र पहाण्यासाठी आला होता. त्यांचा कुलदेवतेचा नामजप अखंड चालू होता. नामजपामुळे त्यांना पुष्कळ अनुभूती आल्या होत्या. त्यांनी ग्रंथांचा पूर्ण संच विकत घेतला. हरिद्वार आणि डेहराडून येथे कार्यक्रम आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली. जातांना त्यांची प्रतिक्रिया सनातनसंबंधी आत्मियता व्यक्त करणारी होती. ते म्हणाले, आपले लोक पुष्कळ दिवसांनी भेटल्यानंतर जसे वाटते, तसे वाटत आहे.
३. सनातनच्या परिश्रमांचे कौतुक करणारे जलसिंचन अधिकारी ! : जलसिंचन विभागाचे अधिकारी सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्र पहाण्यासाठी आले होते. त्यांनी प्रदर्शन पाहून बोलकी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, या प्रदर्शनातील फलक बनवण्यासाठी अनेक वर्षे लागली असतील ना; कारण एकेका विषयावर धर्मशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी, तसेच ते संग्रहित-संकलित करण्यासाठी बराच वेळ लागतो. असे १०० फलक तुम्ही बनवले आहे. हे काम सोपे नाही.
४. एका स्थानिकाचा अभिप्राय – तुम्ही तरुणांना धर्माकडे वळवण्याचे मोठे कार्य करत आहात ! : सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्र हे हरिद्वारच्या कनखल क्षेत्रात होते. तेथील जिज्ञासू अनेक वेळा प्रदर्शनात येत. येतांना परिवारातील सदस्य किंवा इष्टमित्र यांना समवेत घेऊन येत. रविवारच्या दिवशी अनेक कनखलनिवासी आपल्या मुलामुलींना घेऊन प्रदर्शन दाखवण्यासाठी आलेले आम्ही पाहिले.
पाकिस्तानमधून विस्थापित झालेल्या सिंधी समाजाचा एक परिवार प्रदर्शन पहायला आला होता. त्यांची मुलगी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिने जिज्ञासेने सर्व प्रदर्शन पाहून सनातन संस्थेचे कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. पुढे त्यांच्या घरी संपर्कासाठी आम्ही गेलो असतांना, तिचे आई-वडील म्हणाले, आमची मुले नास्तिक नसली, तरी त्यांना देव-धर्माविषयी पुष्कळ आकर्षण नव्हते. तुमच्या प्रदर्शनामध्ये का आणि कसे हे सांगितले असल्याने माझी मुलगी फार प्रभावित झाली आहे. तरुणांना धर्माकडे वळण्यासाठी तुम्ही फार मोठे काम करत आहात !
५. मुलींच्या मनातील धर्माविषयीचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना प्रदर्शन पहाण्यास घेऊन येणारे एक रिक्शाचालक ! : असाच एक अनुभव म्हणजे एके दिवशी संध्याकाळी वडील आपल्या मुलींना घेऊन आले. मुलींच्या मनातील प्रश्न ते अप्रत्यक्षपणे प्रदर्शन दाखवणार्याला विचारत होते. नंतर त्यांनी सांगितले की, मी येथे रिक्शा चालवतो. मी पुष्कळदा प्रदर्शन पाहून गेलो आहे. मुलांच्या मनातील शंका मिटाव्यात; म्हणून इकडे घेऊन आलो. घरी आम्ही कितीही सांगितले, तरी मुलांना ते पटत नव्हते. अजूनही काही लोकांना मी घेऊन येणार आहे.
६. प्रतिवर्षी चारधाम यात्रेच्या कालावधीत प्रदर्शन लावण्यासाठी मोक्याची जागा उपलब्ध करून देणारे महामंडलेश्वर स्वामी विवेकानंदजी ! : हरिद्वार येथील भागवतधामचे महामंडलेश्वर स्वामी विवेकानंदजी महाराज प्रदर्शन पाहून म्हणाले की, प्रतिवर्षी मे आणि जून या कालावधीत चारधाम यात्रा असल्याने हरिद्वार येथे मोठी गर्दी असते. आमच्या भागवतधाम आश्रमाचे सभागृह रेल्वेस्थानकाच्या अगदी समोर आहे. तेथे प्रतिवर्षी तुम्ही हे प्रदर्शन लावा. सर्व साधकांची निवास-भोजन व्यवस्था आम्ही करू !
७. पर्यावरणाविषयीच्या फलकांचा स्वतः च्या प्रदर्शनाद्वारे प्रसार करणारे रा.स्व. संघाचे पदाधिकारी ! : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पर्यावरण समितीचे पदाधिकारी प्रदर्शन पहाण्यासाठी आले होते. आपत्काळासाठी वनौषधींची लागवड करा !, तसेच गंगारक्षण हे पर्यावरणाविषयीचे फलकांची मागणी केली. त्यांनी चंडीघाट येथे उभारण्यात आलेल्या पर्यावरण समितीच्या प्रदर्शनात या फलकांना स्थान दिले.
प्रदर्शन पहाणार्यांचे असे किती तरी अनुभव असतील !
राष्ट्र-धर्म-जागृती विषयीची प्रदर्शने
हरिद्वार येथील माहेश्वरी भवन आणि जम्मू-कश्मीर धमार्थ ट्रस्ट यांनी सनातनचे राष्ट्र-धर्म-जागृती विषयीचे प्रदर्शन लावण्यासाठी स्वतःची जागा निःशुल्कपणे उपलब्ध केली होती. या ठिकाणच्या प्रदर्शनांना जिज्ञासूंना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
साधूसंतांचे स्वागत
कुंभचे मुख्य आकर्षण असते ते म्हणजे पवित्र स्नान ! या पवित्र स्नानासाठी संत त्यांच्या शिष्यांद्वारे सजवलेल्या रथातून स्नानासाठी सर्व भक्तांना दर्शन देत नदी घाटाकडे मार्गक्रमण करतात. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याद्वारे २ पवित्र स्नानाच्या वेळी रस्त्याच्या दुतर्फा कापडी फलक घेऊन साधकांनी संतांचे भावपूर्ण स्वागत केले. एका मेगाफोनद्वारे सर्व संत आणि त्यांचे भक्त यांचे स्वागत करण्यात येत होते. देवता आणि संत यांच्या जयजयकारांनी भक्तांच्या भक्तीचा आनंद द्विगुणित होत होता. एकंदरच उत्साहाचे एक वातावरण स्वागताच्या ठिकाणी झाले होते. संतांनी साधकांना भरभरून आशीर्वाद दिले.
गुढीपाडवा उत्सव
चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा अर्थात् गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात सर्वत्र गुढी उभारण्याची परंपरा आहे. हरिद्वार येथे मात्र गुढी उभारण्याची प्रथा नाही. त्यामुळे हिंदूसंघटनाचा एक प्रयोग म्हणून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुंभक्षेत्रात ३ ठिकाणी विधीवत् गुढी उभारण्याचा कार्यक्रम करण्यात आला.
सप्तसरोवर क्षेत्रात शदाणी भक्त निवास येथे, बैरागी कॅम्पस्थित सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रात अन् कौंडण्यपूर स्थित विदर्भ रुक्मिणी पिठाचे अनंत विभूषित श्री जगद्गुरु रामानंदाचार्य राजराजेश्वराचार्यजी महाराज (समर्थ माऊली सरकार) यांच्या शिबिरात, असे गुढी उभारण्याचे तीन विधीवत् कार्यक्रम करण्यात आले. या कार्यक्रमाला गुढी हिंदु राष्ट्राची.. असे नामकरण करून त्या माध्यमातून उपस्थितांमध्ये हिंदु राष्ट्राविषयी जागृती करण्यासह त्यासाठी प्रतिज्ञा घेण्याचा संकल्प करण्यात आला. या कार्यक्रमाला अखिल भारतीय सैन भक्ती पिठाचे पिठाधीश्वर श्री श्री १००८ सैनाचार्य स्वामी अचलानंदगिरी जी महाराज तथा श्री जगद्गुरु रामानंदाचार्य राजराजेश्वराचार्यजी महाराज यांची वंदनीय उपस्थिती आणि मार्गदर्शन याचा सर्वांना लाभ झाला. संयुक्त आयोजनामुळे हा कार्यक्रम महाराजांच्या भक्तांशी जवळीक वाढवणारा ठरला.
फेसबूकद्वारे कुंभ जनसंवाद
अनेकांना कुंभमेळ्याला यायची इच्छा असते. काही जण आपल्या व्यापामुळे, तर काही जण कोरोना परिस्थितीमुळे कुंभला येऊ शकले नाहीत. जे आले, त्यापैकी अनेकांना कुंभक्षेत्र, गंगा, कुंभच्या परंपरा यांविषयी अधिक माहिती नसते. सर्वांची ही धर्माविषयीची जिज्ञासा पूर्ण व्हावी, यासाठी हिंदु जनजागृति समितिच्या फेसबूक पेजवरून प्रतिदिन कुंभ जनसंवाद, या नावाने फेसबूक लाईव्ह करण्यात आले. गंगा महिमा, गंगा रक्षा, अमृत स्नान, हरिद्वार तीर्थक्षेत्र महत्त्व, कुंभ आणि साधू समाज, कुंभमधील अव्यवस्था अशा प्रासंगिक विषयासह मंदिर सरकारीकरण, धर्मांतर, हिंदु राष्ट्र, असे अनेक विषय या फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोेचवण्यात आले. कुंभविषयक फेसबूक लाईव्ह प्रत्यक्ष घटनास्थळांवरून झाल्याने अनेकांना प्रत्यक्षात कुंभ अनुभवल्याचा आनंद घेता आला.
सनातन संस्थेच्या ग्रंथांचे प्रकाशन
या कालावधीत सनातन संस्था प्रकाशित परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी संकलित केलेले आध्यात्मिक काव्यसंग्रह आणि आपातकाल में जीवित रहने हेतु दैनिक आवश्यकताआेंकी व्यवस्था करें ।, या ग्रंथांचे प्रकाशन ही संतांच्या शुभहस्ते करण्यात आले. ग्रंथ प्रकाशनाच्या माध्यमातून ज्ञानाचे नवे दालन कुंभ क्षेत्री उघडण्यात आले.
संतदर्शन, संतसत्संग, कुंभस्नान या माध्यमातून जीवनात अध्यात्माचा प्रकाश पसरावा, यासाठी १२ वर्षांतून एकदा येणार्या कुंभपर्वात अनेक भाविक पोचले. कोरोना महामारीच्या कठीण काळातही आवश्यक नियमांचे पालन करून ते कुंभक्षेत्री पोचले, यावरून त्यांची श्रद्धा लक्षात येते. अशा श्रद्धाळूंच्या धर्मशिक्षण आणि अध्यात्म यांविषयीच्या शंका दूर होऊन त्यांना प्रत्यक्ष कृतीचे मार्गदर्शन करण्यासाठी कुंभमेळ्यातील विविध उपक्रम लाभदायी ठरले. अनेक साधकही या कठीण काळात धर्मसेवेसाठी १५ दिवस ते १ मासाचा कालावधी काढून हरिद्वारला उपस्थित राहिले. त्यामुळे आगामी घोर आपत्काळापूर्वी समाजाला धर्माचरण आणि साधनेची दिशा देण्यासाठी अन् स्वतःच्या समष्टी साधनेसाठी कुंभ ही पर्वणी ठरली. त्यासाठी श्रीगुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था आणि श्री. श्रीराम लुकतुके, श्री. कार्तिक साळुंखे अन् श्री. आनंद जाखोटिया, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |