पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भरारी पथक खासगी रुग्णालयांवर लक्ष ठेवणार !
पिंपरी (पुणे) १५ मे – काही खासगी रुग्णालयांविषयी रेमडेसिविर इंजेक्शनचा अनावश्यक वापर, अधिक शुल्क आकारून खाट देणे, अशा स्वरूपाच्या अनेक गंभीर तक्रारी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे येत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने भरारी पथक नियुक्त केले असून पथकाद्वारे दोषींविरुद्ध गुन्हे नोंद केले जाणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.
महापालिकेने शहरातील १३५ खासगी रुग्णालयाच्या सेवा अधिग्रहीत केलेल्या आहेत. त्यांनाही रुग्णांवर उपचार करण्यासाठी अनुमती दिली आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर योग्य होतो का ?, बाजारात कुठेही थेट पद्धतीने रेमडेसिविरची विक्री करण्यास मनाई असतांना रुग्णालय इंजेक्शन आणण्यास सांगतात का ?, रुग्णांवर उपचारांसाठी हलगर्जीपणा केला जातो का ?, त्यांना सोयी-सुविधा मिळतात का ? मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी पैसे घेतले जातात का ? अशा स्वरूपाच्या घटनांकडे हे पथक लक्ष ठेवणार आहे. त्यांनी या कामकाजाचा दैनंदिन अहवाल वैद्यकीय विभागाच्या मुख्य कार्यालयास सादर करावा, असे सांगण्यात आले आहे. यात प्रशासकीय कामकाजासाठी सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.