‘ब्रेक द चेन’ स्वप्न साकारण्यासाठी प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर काम करावे लागेल !
शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांनी प्रशासनाची केली कानउघाडणी
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – कोरोनावर नियंत्रण आणण्याचे नियोजन केवळ कागदावर आहे. मंत्रीमंडळ आणि प्रशासन यांच्यात ताळमेळ नाही. त्यामुळे ‘ब्रेक द चेन’ हे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न साकार होण्यासाठी प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर काम करावे लागेल, असे म्हणत शिवसेनेचे माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी प्रशासनाची कानउघाडणी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सावंत पंढरपूर दौर्यावर आले होते. या वेळी त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकार्यांची बैठक घेऊन शिवसेना पदाधिकार्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ ही मोहीम राबवली आहे; मात्र तहसीलदार, पोलीस अधिकारी हे ही मोहीम केवळ कागदावरच राबवत आहेत. अनेक कोरोनाबाधित रुग्ण बाहेर फिरत असल्याने संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे, असा गंभीर आरोप आमदार तानाजी सावंत यांनी या वेळी केला.