तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर सतर्कतेची चेतावणी !
मुंबई – अरबी समुद्राच्या आग्नेय भागात अल्प दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होऊन त्याचे चक्रीवादळामध्ये रूपांतर होऊन १८ मेच्या कालावधीत ते गुजरात किनारपट्टीजवळ पोचण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. १५ ते १७ मे या कालावधीत किनारपट्टी भागातील लोकांना सतर्क रहाण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छिमारांना किनार्यावर येऊन आपल्या बोटी सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत. मुंबई, पालघर, ठाणे येथे रविवारी हलका, तर रायगड जिल्ह्यात या काळात मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला १६ आणि १८ मे या दिवशी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सिद्ध रहाण्याचे आदेश दिले आहेत.