शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या कोरोनाकाळात हिंदूंनी मांसाहार करण्याच्या वक्तव्याचा वारकर्यांकडून निषेध !
अकोला, १४ एप्रिल (वार्ता.) – मुसलमानांमध्ये मांसाहाराचे प्रमाण जास्त असल्याने त्यांच्यात कोरोनाबाधितांची संख्या अल्प आहे. हिंदु धर्मियांमध्ये मांसाहाराचे प्रमाण अल्प असल्याने कोरोनाबधितांची संख्या जास्त आहे. कोरोनाकाळात मंदिरे बंद असल्यामुळे देवही बंदिस्त करण्यात आले आहेत. त्यामुळे आपल्या रक्षणाला कुणीही येणार नाही. आपली काळजी स्वतःच घ्या. हिंदु धर्मियांनी कोरोनापासून वाचण्यासाठी व्रतवैकल्ये आणि कर्मकांड सोडून प्रतिदिन ४ अंडी अन् एक दिवसाआड मांसाहार, तसेच प्रथिनेयुक्त आहार घ्या, असे आवाहन बुलढाणा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी एका स्थानिक वृत्तपत्राच्या मुलाखतीत नुकतेच केले. त्यांच्या वक्तव्याचा अकोला जिल्ह्यातील विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष ह.भ.प. गणेश महाराज शेटे आणि अन्य वारकरी यांनी निषेध व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांनी आमदार गायकवाड यांना क्षमा मागण्यास सांगावी ! – ह.भ.प. गणेश महाराज शेटे
‘या वक्तव्यामुळे संपूर्ण वारकरी संप्रदाय आणि हिंदु समाज यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. युगानुयुगे शाकाहारी असलेल्या हिंदूंना मांसाहाराकडे वळवण्याचा हा प्रयत्न खेदजनक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विषयाची गांभीर्याने नोंद घेऊन आमदार गायकवाड यांना समज द्यावी आणि वारकर्यांसह हिंदूंची जाहीर क्षमा मागायला सांगावी, अन्यथा विश्व वारकरी सेना आणि अन्य वारकरी संघटना एकत्र येऊन आपल्या भागातील पोलीस ठाण्यांमध्ये आमदार गायकवाड यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तक्रार प्रविष्ट करतील. अशा आशयाचे संगणकीय पत्र १२ एप्रिल या दिवशी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवण्यातही आले आहे’, असे ह.भ.प. गणेश महाराज शेटे यांनी कळवले आहे.