नगर येथे कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांना आधुनिक वैद्यांकडून मारहाण
समाजात कोरोना महामारीने हाहा:कार झालेला असतांना सामंजस्याने न वागता अशाप्रकारे एकमेकांना मारहाण करण्याने समाजात अराजकच पसरेल !
नगर, १४ मे – येथील पॅसिफिक केअर सेंटर या खासगी कोविड रुग्णालयातील डॉ. प्रशांत जाधव आणि त्यांचे सहकारी यांनी कोरोनाबाधित रुग्णाचे नातेवाईक आकाश डोके आणि संजय जाधव यांना लोखंडाच्या गजाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. रुग्णाच्या आजूबाजूला पडलेल्या मृतदेहांचे चित्रिकरण केले आणि कोरोनाबाधित रुग्णाचे पक्के देयक मागितले या रागातून ही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
डॉ. जाधव यांनीही डोके आणि त्यांचे मामा जाधव यांच्यासह ४ जणांविरुद्ध नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांच्याविरुद्धही आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांना मारहाण केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.