मानसिक आधाराची आवश्यकता !
सध्या कोरोनामुळे समाजमन सैरभैर झाले आहे. कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांना मिळणार्या हीन वर्तणुकीमुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे. तसेच कोरोना कक्षातून वा अलगीकरणातून पळून जाणे, आत्महत्या करणे आदी घटनांमध्ये वाढ होतांना दिसून येत आहे. सातारा तालुक्यात गत ८ दिवसांमध्ये गृहअलगीकरणामध्ये असणार्या ३ बाधितांनी मानसिक तणावातून आत्महत्या केली. हे चिंताजनक असून अशा प्रकारच्या घटनांमुळे मृतांच्या नातेवाइकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
कोरोनाच्या या संकटकाळात माणूस माणसापासून तुटत चालला आहे. कोरोनाबाधित रुग्णासमोर कोरोनामुळे मृत झालेल्या आप्तस्वकियांच्या चर्चा केल्या जात आहेत. प्रसिद्धीमाध्यमांकडूनही मानसिक ताण वाढवणारे वृत्तसंकलन केले जात असून समाजाची सकारात्मकता वाढवणारे दिशादर्शन केले जात नाही. त्यामुळे कोरोनाबाधित आणि त्यांचे कुटुंबीय अधिकच ताण घेत आहेत. कोरोनामुळे रोजगार ठप्प झाल्यानेही नागरिकांच्या मनात भविष्याची चिंता निर्माण झाली आहे.
नागरिकांच्या मनाचे संतुलन राखण्यासाठी सामूहिक प्रयत्न होणे आवश्यक आहे. यामध्ये कोरोनाबाधितांवर उपचार करणारे डॉक्टर, परिचारक-परिचारिका, कोरोना योद्धे, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना यांचा सहभाग असणे आवश्यक आहे. सर्व सामाजिक घटकांनी कोरोनाबाधितांना सौहार्दपूर्ण वागणूक देऊन त्यांना आधार मिळेल, अशा पद्धतीने त्यांची चौकशी केली पाहिजे. त्यांना मानसिक तणावातून मुक्त करून धीर दिला पाहिजे. कोरोनाबाधितांचे मन सकारात्मक आणि आनंदी रहाण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यांना जीवनातील आनंदी घटनांची आठवण करून देऊन नकारात्मक विचारांतून बाहेर काढले पाहिजे. कोरोनाचे बहुतांश रुग्ण बरे होतात, या वस्तूस्थितीची जाणीव करून द्यायला हवी. मानसिक समुपदेशनाच्या जोडीला अध्यात्माचाही आधार घ्यायला हवा. यामुळे व्यक्तीमध्ये दीर्घकाळाचे परिवर्तन होण्यास साहाय्य होईल. सर्वच स्तरांवर प्रयत्न केल्यास कोरोनाबाधितांच्या आत्महत्यांवर आपण अंकुश ठेऊ शकू, हे निश्चित !
– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा