तलवारी, पिस्तुले यांसह मोठा शस्त्रसाठा जप्त
खामगाव (जिल्हा बुलढाणा) पोलिसांचे पुन्हा ‘कोम्बिंग ऑपरेशन’ !
|
बुलढाणा – जिल्ह्यातील खामगाव येथील पोलिसांनी पुन्हा एकदा राबवलेल्या ‘कोम्बिंग ऑपरेशन’मुळे २ अट्टल गुन्हेगारांना पकडण्यात आलेे. त्यांच्याकडून १ देशी पिस्तूल, नकली सोन्याच्या गिन्या, भ्रमणभाष, तलवारी, अशा मोठ्या शस्त्रसाठ्यासह ३ लाख १३ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अल्प किमतीत सोन्याची खोटी नाणी देण्याचा व्यवहार ठरवायचा. त्यानंतर संबंधितांना खामगाव तालुक्यातील अंत्रज शिवारात बोलवायचे. ग्राहकांना मारहाण करून त्यांच्याकडील रक्कम आणि ऐवज लुटायचा, अशी या टोळीची कार्यपद्धती होती. मारहाण करणार्या टोळीला गेल्या आठवड्यात पोलिसांनी अटक केली होती. त्यांची चौकशी केली असता आणखी धागेदोरे हाती लागले. त्या आधारे १२ मे या दिवशी पहाटे पुन्हा पोलिसांनी ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवले. २० अधिकारी, २ आर्.सी.बी पथक आणि ८० अंमलदार यांचा यामध्ये सहभाग होता. या टोळीने ५ मे या दिवशी पुणे येथील २ व्यावसायिकांची अशीच फसवणूक केली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी अंत्रज येथे शोधमोहीम हाती घेतली. त्या वेळी या टोळीतील १५ जणांना अटक केली होती. या आरोपींकडून २ पिस्तुले आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.