सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ ते १७ मे या कालावधीत चक्रीवादळाची शक्यता

सर्व यंत्रणांना सतर्क रहाण्याच्या जिल्हाधिकार्‍यांच्या सूचना

चक्रीवादळाची शक्यता

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – आग्नेय अरबी समुद्रामध्ये अल्प दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे केरळ, तसेच लक्षद्वीप किनार्‍यावर चक्रीवादळ निर्माण होऊन त्याची तीव्रता वाढत जाईल, अशी चेतावणी भारतीय हवामान विभागाने दिली आहे. या वादळाचा परिणाम १४ ते १७ मे या कालावधीत दक्षिण कोकण आणि गोवा राज्य या किनार्‍यावर होण्याची शक्यता आहे. १५ आणि १६ मे या दिवशी जिल्ह्यात वार्‍यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत.

जिल्ह्यात १४ आणि १५ मे या दिवशी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची, तसेच अनुमाने ३० ते ४० कि.मी. प्रतिघंटा वेगाने वारे वहाण्याची शक्यता वर्तवली आहे. १६ मे या दिवशी महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांच्या किनार्‍यावर ४० ते ६० कि.मी. प्रतिघंटा वेगाने वारे वहाण्याची शक्यता आहे. त्यामुळे १५ आणि १६ मे या कालावधीत सर्व मासेमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याच्या सुचना दिल्या असून समुद्रकिनार्‍यावरील गावांना सावधानतेची चेतावणी देण्यात आली आहे.